In Beed, wife’s relatives brutally beat husband Ramhari More after marital dispute : सततच्या भांडणाला कंटाळून दुसरीकडे राहायला गेलेल्या पतीला पत्नीच्या नातेवाईकांनी जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या मारहाणीत पती गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामहरी मोरे असे मारहाण झालेल्या पतीचे नाव आहे. १० महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला. विवाहानंतर तो पत्नीसह बीडमध्ये एका भाड्याच्या घरात राहत होता. मात्र, लग्नाच्या काही दिवसांनंतरच छोट्या छोट्या गोष्टींवरून पतीपत्नीत खटके उडू लागले. अखेर सततच्या भांडणाला कंटाळून त्याने दुसरीकडे राहण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, पती दुसरीकडे राहायला गेल्याने संतापलेल्या पत्नीने तिच्या भावाकडे याची तक्रार केली. तिच्या भावाने रामहरीचा पाठलाग करत त्याला एका सूनसान जागी गाठले. यावेळी मेहुण्यासह तिघांनी त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
या मारहाणीत रामहरीचा डावा पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महत्त्वाचे म्हणजे रामहरीच्या तक्रारीनंतर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात पत्नीच्या माहेरच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये मेहुणा आणि सासूचा समावेश आहे. याप्रकरणी तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.