पुणे - ससून रुग्णालयातील मनोविकृतीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. नितीन नागनाथ अभिवंत (वय-४२, मूळ गाव देवडी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांचे हिमालयातील बुरान व्हॅली येथे ट्रेकिंगदरम्यान श्वासोच्छवासात अडथळा आल्याने सोमवारी (ता. ९) निधन झाले. ते शनिवारी (ता. ७) मुंबई येथून महाविद्यालयीन मित्रांसोबत ट्रेकिंगसाठी गेले होते. या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांसह ससून रुग्णालयातील त्यांच्या सहकारी, कर्मचाऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे.
डॉ. अभिवंत यांनी सोलापूर येथे पाच वर्षांच्या सेवेनंतर ससून रुग्णालयात मनोविकृतीशास्त्र विभागात २०१४ पासून कार्यरत होते. कार्यतत्पर शैलीमुळे त्यांनी वेगळा ठसा उमटविला होता.
महाविद्यालयीन जीवनापासूनच गिर्यारोहणाची आवड असलेल्या अभिवंत यांनी वेगवेगळ्या किल्ल्यावर गिर्यारोहण केले होते. त्यांनी शनिवारी मुंबई येथून त्यांनी महाविद्यालयीन मित्रांसह हिमालयाकडे प्रयाण केले होते.
सोमवारी सकाळी गिर्यारोहणास सुरवात केल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात त्यांना श्वासोच्छवासात अडथळा आल्याने धाप लागून घाम फुटला असता सोबत असलेल्या दोन डॉक्टर मित्रांनी त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना तत्काळ बेस कॅम्पवरील रुग्णालयात हलविले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
अनेक राष्ट्रीय उपक्रम व संशोधनात त्यांचा मोठा सहभाग असल्याचे त्यांचे सहयोगी प्रा. डॉ. नितीन थोरात यांनी सांगितले. उमद्या, शिस्तप्रिय आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्वाच्या डॉ. अभिवंत यांनी अनेक गरजू रुग्णांना मदतीचा हात दिला होता. निधनाबद्दल ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार व वैद्यकीय अधीक्षक यलप्पा जाधव यांनीही दु:ख व्यक्त केले आहे.