Raja Raghuvanshi Honeymoon Case : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. हत्येपूर्वीचा त्याचा शेवटचा फोटो आता समोर आला असून, तो आसाममधील प्रसिद्ध कामाख्या देवी मंदिरात (Kamakhya Temple) दर्शन घेतल्यानंतर काढण्यात आला होता.
या फोटोमध्ये राजा एकटाच दिसत आहे आणि त्याच्या कपाळावर लावलेल्या टिळ्याचा स्पष्ट उल्लेख आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पत्नी सोनमच्या आग्रहामुळे त्यांनी या मंदिराला भेट दिली होती. सोनमने राजाला सांगितले होते की, 'मंदिराचे दर्शन घेतल्याशिवाय त्यांच्या वैवाहिक नात्यात जवळीक निर्माण होणार नाही.'
शिलाँगऐवजी होता थायलंडचा पर्यायमुळात राजा रघुवंशी हनिमूनसाठी थायलंडला जाण्याच्या विचारात होता. परंतु, सोनमने कामाख्या देवीचे दर्शन घेण्याचा अट्टहास धरल्याने राजाने शिलाँगची निवड केली. याच निर्णयामुळे त्यांचा हत्येचा कट यशस्वी झाला, असा प्राथमिक अंदाज आहे.
गुवाहाटीतच रचला राजाच्या हत्येचा कटशिलाँग पोलिसांच्या तपासात हेही स्पष्ट झाले आहे की, आरोपी आकाश, विशाल आणि आनंद हे तिघेही शिलाँगपूर्वी गुवाहाटीमध्ये आनंद लॉजमध्ये राहिले होते. त्यांनी विद्यार्थी असल्याचं भासवत लॉजमध्ये प्रवेश मिळवला होता. १९ मे रोजी त्यांनी लॉजमध्ये मुक्काम केला आणि २० मे रोजी शिलाँगला प्रयाण केले. याच दरम्यान, त्यांनी गुवाहाटीतून हत्या करण्यासाठी लागणारे शस्त्र खरेदी केल्याचेही निष्पन्न झाले आहे. पोलिसांचा संशय आहे की, गुवाहाटीतच राजाची हत्या करण्याचा कट रचला गेला होता, मात्र त्यांना तेथे संधी मिळाली नाही.
इंदूरमधील वाहतूक व्यावसायिक राजा रघुवंशी याचे ११ मे रोजी सोनमसोबत लग्न झाले होते. २१ मे रोजी दोघे हनिमूनसाठी शिलाँगला गेले. मात्र, २३ मे रोजी सोनमने तिचा प्रियकर राज कुशवाहाच्या तीन साथीदारांच्या मदतीने राजाची हत्या केली. चौघांनी मिळून राजावर खंजीराने हल्ला करून त्याचा खून केला आणि मृतदेह जंगलातील एका दरीत फेकला.
१७ दिवसांनी सोनम अटकेत; गुन्ह्याचा उलगडाराजा आणि सोनमशी संपर्क न झाल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. २ जून रोजी राजाचा मृतदेह सापडला. त्यानंतर सोनम फरार होती. मात्र, ९ जून रोजी गाझीपूरमधील एका ढाब्यावरून सोनमला अटक करण्यात आली. इतर चार आरोपींना मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली. सोनमच्या अटकेनंतरच या गुन्ह्यातील सर्व पैलू उघड झाले.