वृत्तसंस्था / नवी दिल्ली
विद्यमान आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 6.3 टक्के राहण्याची शक्यता आहे, असे नवे अनुमान जागतिक बँकेने व्यक्त केले आहे. भारताची निर्यात अपेक्षेनुसार होत नसल्याने विकासदरावर परिणाम होणे शक्य आहे, असे बँकेने स्पष्ट केले आहे. यापूर्वीचे विकासदराचे अनुमान 6.7 टक्के इतके होते.
केवळ भारताचीच नव्हे, तर जगाची अर्थव्यवस्थाही अपेक्षेपेक्षा कमी वेगाने वाढणार आहे. या आर्थिक वर्षात जगाच्या आर्थिक विकासाचा दर 2.3 टक्के असेल, असे नव्या अनुमानात स्पष्ट करण्यात आले आहे. जागतिक विकासाचे यापूर्वीचे अनुमान 2.7 टक्के इतके होते. बुधवारी नवी आकडेवारी देण्यात आली.
दोन वर्षांमध्ये वाढ होणार
या आर्थिक वर्षात विकासदर अपेक्षेनुसार वाढणार नसला, तरी पुढच्या दोन वर्षांमध्ये तो अधिक वेगाने वाढणार आहे, असेही भाकित जागतिक बँकेने केले आहे. 2026-27 आणि 2027-28 या पुढच्या दोन आर्थिक वर्षांमध्ये भारताची अर्थव्यवस्था सरासरी प्रत्येक वर्षी 6.6 टक्के या दराने वाढणार आहे.
भारताच्या अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला
भारत ही दक्षिण आशिया प्रदेशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. भारतात औद्योगिक उत्पादनाचा वेग काहीसा मंदावण्याची शक्यता आहे. मात्र, सेवा क्षेत्राची प्रगती समाधानकारक आहे. कृषीक्षेत्राची वाढही अनुकूल आहे. पण, सेवाक्षेत्रातील आणि कृषीक्षेत्रातील विकास वाढीला उत्पादन क्षेत्रातील मंदीचा छेद जात आहे. त्यामुळे एकंदर आर्थिक विकासाचे अनुमान कमी करावे लागत आहे, असे जागतिक बँकेच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
जगातही तीच स्थिती
जागतिक अर्थव्यवस्थेलाही सध्या अस्थिरता, धोरण अनिश्चितता आणि पुरवठा साखळ्यांमधील अडथळे यांनी ग्रासले आहे. विविध देशांमधील व्यापारी तणावांचाही विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे साऱ्या जगाची अर्थव्यवस्थाही मंदावत आहे. परिणामी चालू आर्थिक वर्षात जगाचा विकास 2.3 टक्के दराने होईल. ही 2008 पासूनची सर्वात कमी वाढ असेल, असेही जागतिक बँकेने स्पष्ट केले. 2027 आणि 2028 या आर्थिक वर्षांमध्येही जगाचा विकास दर जास्तीत जास्त सरासरी 2.5 टक्के इतकाच राहील, असाही नकारात्मक सूर बँकेकडून लावण्यात आला.