दोडामार्गात झाड कोसळल्याने गोवा मार्गावरील वाहतूक ठप्प
esakal June 12, 2025 11:45 PM

swt1211.jpg
70143
दोडामार्ग ः झाड पडल्याने खोळंबलेली वाहतूक.

दोडामार्गात झाड कोसळल्याने
गोवा मार्गावरील वाहतूक ठप्प
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १२ : बुधवारपासून (ता. ११) सुरू झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर आज भल्या पहाटे दोडामार्ग शहरात पोस्ट ऑफिस नजीक एक भले मोठे झाड रस्त्याच्या मधोमध कोसळले. त्यामुळे दोडामार्ग-गोवा मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद झाली होती. बुधवारपासून शहरात पाऊस सुरू असून संपूर्ण शहरात पावसाळी वातावरण आहे. विजेचा लपंडाव देखील नेहमीप्रमाणे सुरूच होता.
आज पहाटेच्या सुमारास पोस्ट ऑफिसच्या अलीकडे रस्त्यालगत असलेले जांभळीचे एक भले मोठे झाड उन्मळून रस्त्याच्या मध्यभागी पडले. त्यामुळे दोडामार्ग-गोवा मार्गावरील वाहतूक पूर्णतः खोळंबली. झाड कोसळल्याच्या ठिकाणापासून ते पिंपळेश्वर चौक व पलीकडे पोस्ट ऑफिस ते तहसीलदार कार्यालयापर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या. या भागातील रहिवाशांनी तातडीने नगरपंचायतीला संपर्क साधला. नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरील झाडाचा काही भाग कापून वाहतूक सुरळीत केली; मात्र झाडाचा बराचसा भाग अजूनही रस्त्याच्या कडेला असून सार्वजनिक बांधकाम विभागाने ते पूर्णतः हटवण्याची मागणी होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.