वृद्ध महिलेची सोन्याची चैन आठ तासांत परत केली
esakal June 12, 2025 11:45 PM

वृद्ध महिलेची सोन्याची चेन आठ तासांत परत केली
धारावी पोलिसांची कारवाई
धारावी, ता. १२ (बातमीदार) :
वृद्ध महिलेची चोरीला गेलेली सोन्याची चेन आठ तासांत परत करण्यात धारावी पोलिसांना यश आले आहे. या कारवाईबाबत पोलिसांचे कौतुक होत आहे.
धारावी कोळीवाडा येथील हिरागी शिमगा चाळ येथे बुधवारी (ता. ११) दुपारी ३ च्या सुमारास विनोद विष्णू कोळी (४७ वर्षे) यांची आई मंदा विष्णू कोळी (७० वर्षे) या घराबाहेर कट्ट्यावर बसल्या होत्या. त्या वेळी अचानक एका व्यक्तीने मंदा कोळी यांच्या गळयातील सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून घेतली. त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता हाताने मारहाण करून तिला दुखापत केली. तसेच गळ्यातील २२ हजार रुपये किमतीची २.४ ग्रॅम वजनाची अर्धवट तुटलेली सोन्याची चेन जबरस्तीने हिसकावून पळायन केले. याबाबतची तक्रार विनोद विष्णू कोळी यांनी दिली.
आरोपीबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसताना प्राप्त वर्णनावरून तसेच घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपीचा तपास केला. धारावी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू बिडकर यांनी विविध पथके तयार करून आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना केले. पोलिस उपनिरीक्षक शेलार व गुंडा पथकातील पोलिस हवालदार वरखडे, मंगेश जाधव, पोलिस शिपाई उमेश सोयंके, बजरंग लांडगे यांना गुप्त बातमीदाराकडून आरोपी हा गोवंडीतील शिवाजी नगर या ठिकाणी आल्याचे समजले. तातडीने पोलिस पथकाने आरोपीला अटक केली. ही कामगिरी पोलिस उपायुक्त गणेश गावडे, परिमंडळ पाचचे सहाय्यक पोलिस आयुक्त अरुण भोर, पोलिस निरीक्षक सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे निगराणी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद साळोखे, पोलिस उपनिरीक्षक धनराज कोळी, गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव कदम, पोलिस उपनिरीक्षक विकास शेलार व पथकाचे पोलिस हवालदार दत्तात्रय वरखडे, पोलिस हवालदार मंगेश जाधव, पोलिस शिपाई उमेश सोयंके, बजरंग लांडगे, सतीश अनपट, सागर वाघ यांनी केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.