वडगावात उद्या डायलिसिस सुविधा
esakal June 14, 2025 04:45 AM

वडगाव मावळ, ता. १३ : रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मावळ विचार मंचाच्या वतीने अटल आरोग्य अभियानांतर्गत वडगाव येथे मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, या सुविधेचे लोकार्पण रविवारी (ता.१५) करण्यात येणार आहे.
आर. के. लुंकड उद्योगसमूहाचे अध्यक्ष रमणलाल लुंकड यांच्या सहयोगातून वडगाव येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये ही सुविधा उपलब्ध होणार आहे. वडगाव शहरातील डायलिसिस उपचार घेणाऱ्या रुग्णांना शहरापासून दूर जावे लागते. त्यात अधिक पैसे खर्च होतात. रुग्णासह सोबत असलेल्या नातेवाइकांच्या वेळेचा अपव्यय होतो. या सर्व गैरसोयी लक्षात घेऊन येथील मावळ विचार मंच संस्थेच्या वतीने रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आर. के. लुंकड उद्योगसमूहाच्या सहयोगातून मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रविवारी (ता. १५) सायंकाळी पाच वाजता विघ्नहर्ता हॉस्पिटल येथे या सुविधेचा उद्घाटन समारंभ होणार आहे. उद्योजक रमणलाल लुंकड, जैन आर्थिक विकास महामंडळाचे ललित गांधी, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, आमदार सुनील शेळके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मावळ विचार मंचाचे संस्थापक भास्करराव म्हाळसकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील अशी माहिती मावळ विचार मंच कार्यकारिणीचे प्रमुख गुलाबराव म्हाळसकर यांनी दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.