अंबरनाथमध्ये किरकोळ वादातून दोन गटांत राडा
esakal June 15, 2025 12:45 AM

अंबरनाथ, ता. १४ (वार्ताहर) : अंबरनाथमध्ये किरकोळ वादातून दोन गट भिडल्याची घटना घडली आहे. गाडी चालवताना रस्त्यामध्ये आलेल्या तरुणाला हटकल्याने त्याने माजी नगरसेविकेच्या मुलीला शिवीगाळ केली. त्यामुळे माजी नगरसेविकेच्या समर्थकांनी शिवीगाळ करणाऱ्या तरुणावर तलवार आणि कोयत्याने वार केले. यानंतर संतापलेल्या जमावाने वार करणाऱ्या तरुणांना चोप देत माजी नगरसेविकेच्या घरावर दगडफेक केली. अंबरनाथच्या बारकू पाडा परिसरात ही घटना घडल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे.
अंबरनाथच्या बारकू पाडा परिसरात राहणाऱ्या माजी नगरसेविका अनिता भोईर यांची मुलगी अबोली ही शुक्रवारी (ता. १३) सायंकाळी न्यायालयातून घरी येत असताना फासेपारधी समाजातील मंगेश राजपूत (वय ३२) हा तरुण रस्त्यावर आडवा चालत जात होता. त्यामुळे तिने या तरुणाला बाजूला होण्यासाठी तीन वेळा गाडीचा हॉर्न मारला. मात्र, तो बाजूला न झाल्याने तिने त्याला हटकले. त्यानंतर त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. तरुणाने अबोलीला शिवीगाळ केली. ही बाब समजताच अनिता भोईर यांचे समर्थक असलेल्या दोन तरुणांनी शिवीगाळ करणाऱ्या फासेपारधी तरुणावर धारदार शस्त्राने वार केले. हे तरुण वार करून पळून जात असतानाच फासेपारधी समाजाने त्यांना घेराव घालत चोप दिला. त्यांचा पाठलाग करत थेट भोईर यांच्या घरावर दगडफेक केली. या सगळ्या घटनेनंतर फासेपारधी समाजातील जखमी तरुण राजा घोरपडे याला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर शिवाजीनगर पोलिसांनी बारकू पाडा परिसरात धाव घेत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. याप्रकरणी कुणाल बाबरे, प्रशांत भोईर, ओम याच्यासह आणखी सहा ते सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.