WTC 2025-27 Schedule: द. आफ्रिका जिंकली, आता पुढील WTC चे वेळापत्रक कसं असेल? ऑस्ट्रेलिया, इंग्लंड सर्वाधिक मॅच खेळणार, भारत....
esakal June 15, 2025 08:45 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेचे तिसरे पर्व (२०२३-२५) शनिवारी संपले. दक्षिण आफ्रिकेने लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या अंतिम सामन्यात शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवत तिसऱ्या पर्वाचे विजेतेपद पटकावले. दक्षिण आफ्रिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेचे तिसरे विजेते ठरले. दरम्यान, त्यांच्या विजयासह तिसरं पर्व संपलं.

आता लगेचच चौथ्या पर्वाला म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. येत्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या चौथ्या पर्वात ९ संघांमध्ये एकूण ७१ सामने खेळले जाणार आहे.

१७ जून रोजी श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेने चौथ्या पर्वाची सुरुवात होईल. त्यानंतर लगेचच २० जूनपासून भारताला इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. हे मालिकाही चौथ्या पर्वाचा भाग असून दोन्ही संघ या मालिकेपासून नव्या पर्वातील आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहेत. तसेच या मालिकेपासून शुभमन गिलच्या कसोटी नेतृत्वालाही सुरुवात होणार आहे.

आगामी चौथ्या पर्वात सर्वाधिक कसोटी सामने ऑस्ट्रेलिया संघ खेळणार आहे. ते दोन वर्षात २२ कसोटी सामने खेळणार आहेत, तर त्यापाठोपाठ इग्लंडं २१ कसोटी सामने आगामी दोन वर्षात खेळेल. या पर्वात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात होणारी प्रतिष्ठेची ऍशेस मालिकाही पाहायला मिळणार आहे. ही मालिका २०२५ च्या अखेरीस ऑस्ट्रेलियात होईल.

या चौथ्या पर्वात एकूण १८ कसोटी सामने खेळणार आहे. यात मायदेशात वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघांविरुद्ध कसोटी मालिका होईल, तर इंग्लंड, श्रीलंका आणि न्यूझीलंड हे परदेशी दौरे भारताला या पर्वात करायचे आहेत.

तिसऱ्या पर्वाचे विजेते दक्षिण आफ्रिका आपल्या चौथ्या पर्वातील मोहिमेला ऑक्टोबर २०२५ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेने सुरुवात करेल. त्यांना मायदेशात २०२६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धही कसोटी मालिका खेळायची आहे.

भारतासमोरील आव्हाने

भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या चौथ्या पर्वात इंग्लंडव्यतिरिक्त श्रीलंका आणि न्यूझीलंडचे दौरे करणार असून या दोन्ही दौऱ्यात प्रत्येकी २ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. तसेच भारताला मायदेशात वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका संघांविरुद्ध प्रत्येकी २ सामन्यांची मालिका खेळायची आहे.

त्याबरोबरच भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात ५ सामन्यांची कसोटी मालिकाही खेळणार आहे. म्हणजेच येत्या दोन वर्षात भारताला ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंडसह विजेत्या दक्षिण आफ्रिका या संघांचे तगडे आव्हान पेलावे लागणार आहे.

भारताचे इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक
  • २० ते २४ जून - पहिला कसोटी सामना, हेडिंग्ले, ली़ड्स

  • २ ते ६ जुलै - दुसरा कसोटी सामना, एजबस्टन, बर्मिंगहॅम

  • १० ते १४ जुलै - तिसरा कसोटी सामना, लॉर्ड्स, लंडन

  • २३ ते २७ जुलै - चौथा कसोटी सामना, ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर

  • ३१ जूलै ते ४ ऑगस्ट - पाचवा कसोटी सामना, ओव्हल, लंडन

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ स्पर्धेचे वेळापत्रक (WTC 2025-27)
  • भारत - ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका (मायदेशात); न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका (परदेशात).

  • ऑस्ट्रेलिया - न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश (मायदेशात); भारत, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका (परदेशात)

  • बांगलादेश - इंग्लंड, वेस्ट इंडिज, पाकिस्तान (मायदेशात); ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका (परदेशात).

  • इंग्लंड - न्यूझीलंड, भारत, पाकिस्तान (मायदेशात);ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश (परदेशात).

  • न्यूझीलंड - भारत, वेस्ट इंडिज, श्रीलंका (मायदेशात); ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान (परदेशात).

  • पाकिस्तान - न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका (मायदेशात); इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश (परदेशात).

  • दक्षिण आफ्रिका - ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, बांगलादेश (मायदेशात); भारत, पाकिस्तान, श्रीलंका (परदेशात).

  • श्रीलंका - भारत, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश (मायदेशात); न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, पाकिस्तान (परदेशात).

  • वेस्ट इंडिज - ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका (मायदेशात); न्यूझीलंड, भारत, बांगलादेश (परदेशात).

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.