MPL 2025: सातारा वॉरियर्सचा रत्नागिरी जेट्सवर विजय; अदाणी महाराष्ट्र प्रीमियर लीग : राजवर्धन हंगरगेकरची प्रभावी गोलंदाजी
esakal June 16, 2025 04:45 PM

पुणे : राजवर्धन हंगरगेकर (३/१४) याने केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर सातारा वॉरियर्स संघाने रत्नागिरी जेट्स संघावर डकवर्थ लुईस नियमानुसार १४ धावांनी विजय साकारला. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने अदाणी महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत सातारा वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना रत्नागिरी जेट्स संघाने २० षटकांत नऊ बाद १४६ धावा उभारल्या. पॉवरप्लेमध्ये अथर्व धर्माधिकारी (सात धावा), धीरज फटांगरे (१२ धावा) हे बाद झाल्यामुळे रत्नागिरी संघ दोन बाद ४३ अशा स्थितीत होता.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत सातारा वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना रत्नागिरी जेट्स संघाने २० षटकांत नऊ बाद १४६ धावा उभारल्या. पॉवरप्लेमध्ये अथर्व धर्माधिकारी (सात धावा), धीरज फटांगरे (१२ धावा) हे बाद झाल्यामुळे रत्नागिरी संघ दोन बाद ४३ अशा स्थितीत होता.

त्यानंतर किरण चोरमलेने अफलातून फटकेबाजी करीत ३८ चेंडूंत अर्धशतक साजरे केले. किरण चोरमलेने दिव्यांग हिंगणेकरच्या साथीत पाचव्या विकेटसाठी ३४ चेंडूंत ४२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करून संघाचा डाव सावरला. किरणने ४१ चेंडूंत ५२ धावांची खेळी केली. त्यात त्याने दोन चौकार व तीन षटकार मारले. दिव्यांग हिंगणेकर १४ धावांवर तंबूत परतला. हे दोघेही बाद झाल्यानंतर अभिषेक पवारने १० चेंडूंत एक चौकार व तीन षटकारांच्या साहाय्याने २५ धावा काढून संघाला १४६ धावांपर्यंत मजल मारून दिली.

रत्नागिरीकडून मिळालेल्या १४७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ओम भोसलेला (सात धावा) प्रदीप दाढेने त्रिफळाचीत केले. त्यानंतर सलामीवीर पवन शहाने २२ चेंडूंत ४५ धावांची आक्रमक खेळी केली. त्याने नऊ चौकार मारले. त्याचे पाच धावांनी अर्धशतक हुकले. पवन व अनिरुद्ध साबळे (१७ धावा) यांनी दुसऱ्या विकेटसाठी १९ चेंडूंत २९ धावांची भागीदारी केली. नवव्या षटकात फिरकीपटू सत्यजीत बच्चावने पवन शहा (४५ धावा), सौरभ नवलेला (०) एकापाठोपाठ बाद करून सातारा संघाला अडचणीत टाकले.

त्यानंतर अनिकेत पोरवालने नाबाद २७ धावांची व हर्षल काटे नाबाद १६ धावांची खेळी करून डाव सावरला. सातारा संघ १४.४ षटकांत चार बाद ११६ धावा अशा स्थितीत होता. पाऊस सुरू झाल्यामुळे खेळ थांबवण्यात आला. त्यानंतर खेळ होऊ शकला नाही. पावसाच्या व्यत्ययामुळे या लढतीत डकवर्थ लुईस नियमाचा अवलंब करण्यात आला. सातारा संघाने १४ धावांनी विजय मिळवला.

संक्षिप्त धावफलक : रत्नागिरी जेट्स : २० षटकांत नऊ बाद १४६ धावा (किरण चोरमले ५२, अभिषेक पवार २५, दिव्यांग हिंगणेकर १४, धीरज पटांगरे १२, राजवर्धन हंगरगेकर ३-१४, समाधान पंगारे २-२९, वैभव दारकुंडे १-४४) पराभूत वि. सातारा वॉरियर्स : १४.४ षटकांत चार बाद ११६ धावा (पवन शहा ४५, अनिकेत पोरवाल नाबाद २७, अनिरुद्ध साबळे १७, हर्षल काटे नाबाद १६, सत्यजीत बच्चाव ३-१३, प्रदीप दाढे १-१९).

सामनावीर - राजवर्धन हंगरगेकर.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.