Pune Crime : शहरात पाच ठिकाणी घरफोड्यांमध्ये ४५ लाखांचा ऐवज चोरी
esakal June 17, 2025 12:45 AM

पुणे : शहरात हडपसर, धायरी, कोरेगाव पार्क आणि मार्केट यार्ड अशा विविध भागात शनिवारी रात्री पाच घरफोडीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी ४५ लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लांबवला. यामध्ये हडपसरमधील एका सदनिकेतून ३८ लाख ८८ हजार रुपयांचे सोन्याचे, हिरेजडीत दागिने व रोकड चोरी करण्यात आली.

या प्रकरणी हडपसरमधील वैभव चित्रपटगृहामागील सेजल गार्डन सोसायटीतील एका महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी घराला कुलूप लावून कुटुंबीय बाहेर गेले होते. यावेळी चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याचे, हिरेजडीत दागिने आणि ५५ हजारांची रोकड असा ३८ लाख ८८ हजारांचा ऐवज लंपास केला. रविवारी घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपिका जवंजाळ करीत आहेत.

गोपाळपट्टी परिसरात घरफोडीत दागिने चोरी

हडपसरमधील गोपाळपट्टी परिसरातील केजीएन पार्क सोसायटीमधील सदनिकेतून चोरट्यांनी २९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याबाबत एका तरुणाने तक्रार दिली आहे. त्यानुसार हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धायरीत साडेचार लाखांचे दागिने चोरी

धायरीतील राजवीर रेसिडेन्सी सोसायटीमधील एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी चार लाख ५९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत एका ४० वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानुसार नांदेड सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मार्केट यार्डमध्ये विदेशी चलनासह दागिने चोरी

बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावरील वास्तूनगरजवळ गणांत्र कॉम्प्लेक्समध्येही एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी अमेरिकन डॉलर्स, ६५ हजारांचा सोन्याचा बाजूबंद आणि मोबाइल चोरून नेला. या प्रकरणी एका ५० वर्षीय व्यक्तीने मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नारंगीबागमध्ये घरफोडीचा प्रयत्न

बंडगार्डन रस्त्यावरील नारंगीबाग परिसरातील नित्यानंद कॉम्प्लेक्समधील एका ज्येष्ठ महिलेच्या घराचे कुलूपही चोरट्यांनी तोडले. त्यानंतर चोरट्यांनी घरातील ऐवज चोरण्याचा प्रयत्न केला. याबाबत महिलेने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.