भंडारा : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे काही दिवसांपासून बिगुल वाजले. यानंतर राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी राज्यात बाजार समितीच्या आणि दूध संघाच्या निवडणुका होताना दिसत आहेत. या निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमधील पक्ष हातमिळवणी करताना दिसत आहेत. (Nana Patole and Narendra Bhondekar together for the milk union elections in Bhandara district)
सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आणि भाजप आमदार एकत्र आल्याचं पाहायला मिळालं होतं. अशातच एकनाथ शिंदेंवर बंडानंतर गद्दार म्हणून टीका करणाऱ्या एकनाथ शिंदेंचे पूर्व विदर्भ समन्वयक व आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासोबत काँग्रेस नेते व आमदार नाना पटोले यांनी हातमिळवणी केली आहे. भंडारा जिल्ह्यातील दूध संघाच्या निवडणुकीसाठी दोन्ही नेते एकत्र आले आहेत, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे आता दूध संघाच्या निवडणुकीवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा – Harshwardhan Sapkal : संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, इंद्रायणी पूल दुर्घटनेप्रकरणी सपकाळांची मागणी
दूध संघाच्या निवडणुकीसाठी नरेंद्र भोंडेकर यांच्यासोबत हातमिळवणी केल्यानंतर नाना पटोले म्हणाले की, सहकारमध्ये कुठल्याही पक्षाच्या चिन्हावर निवडणूक होत नाही. त्यामुळे नरेंद्र भोंडेकर हे शिवसेनेचे असले तरी या जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही दोघेही मिळून काम करत आहोत. त्यामुळे दूध संघाच्या निवडणुकीला राजकीय वळण देऊ नये. जिल्ह्याच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ही निवडणूक आहे. दूध संघाची निवडणूक पार पडल्यानंतर बँकेच्या निवडणुकीसाठी आम्ही पुन्हा एकत्र बसू. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आमचे स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी सांगतील त्यानुसार होईल, असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही नाना पटोले शिवसेनेसोबत युती करणार का? हेही पाहावे लागेल.
नरेंद्र भोंडेकर म्हणाले की, जे स्वतःला सहकार महर्षी समजतात, अशा भंडारा जिल्ह्यातील सहकार महर्षींनी जिल्ह्याला चौपाट केलं आहे. परंतु जिल्हा दूध संघाला ज्यांनी डबघाईस आणलं त्यांच्याविरोधात ही लढाई आहे. सर्वसामान्य माणूस आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी ही सहकारातील युती आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत, असे नरेंद्र भोंडेकर यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – Sanjay Raut : फडणवीस – ठाकरेंच्या भेटीवेळी मुंबईतले बिल्डरही उपस्थित, राऊतांच्या दाव्याने खळबळ