दिल्लीच्या यूट्युबरने अनेकांना फसवल्याचा संशय
मुंबईतील महिलेकडून उकळले १९ लाख
मुंबई, ता. १६ ः शहरातील ४५ वर्षीय महिलेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दिल्लीतील यूट्युबर तरुणाला सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पीयूष कटियाल असे आरोपीचे नाव असून, त्याने समाजमाध्यमावरील पाठीराख्यांच्या वलयातील अन्य महिलांनाही फसवले असावे, असा दाट संशय सायबर पोलिसांना आहे. त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.
खोडसाळ रीलसाठी कटियाल प्रसिद्ध असून, त्याचे सुमारे पाच लाखांहून अधिक पाठीराखे आहेत. तक्रारदार महिला त्यापैकीच एक. गेल्यावर्षी कटियालचे रील महिलेच्या पाहण्यात आले. ते आवडल्याने तिने स्तुतीपर कमेंट करण्यास सुरुवात केली. त्या कमेंट पाहून कटियालने संपर्क साधला. दोघांमध्ये मैत्री झाली.
महिलेचा विश्वास संपादन केल्यावर कटियालने वैद्यकीय निमित्त पुढे करून या महिलेकडे आर्थिक मदत मागितली. महिलेनेही निःसंकोचपणे मदत केली. मात्र या ना त्या निमित्ताने कटियाल नियमितपणे महिलेकडे पैसे मागू लागला. तीही मदत करीत गेली. एका क्षणी महिलेकडून जमापुंजी संपली आणि तिने पैसे परत करण्यासाठी कटियालकडे तगादा लावला.
तेव्हा कटियालने दोघांमधील संभाषण (चॅट) सार्वजनिक करण्याची, पोलिस दलात चांगली ओळख असून, खोट्या प्रकरणात गोवण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने एकूण १९ लाख रुपये कटियालला दिले. त्यानंतरही पैशाची मागणी सुरूच राहिल्याने महिलेकडे पोलिस तक्रार करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
गेल्या महिन्यात या महिलेने सायबर पोलिस ठाण्यात (उत्तर विभाग) तक्रार दिली. त्याआधारे तांत्रिक तपास करून पोलिसांनी कटियाल यास अटक केली. सायबर विभागाचे उप आयुक्त पुरुषोत्तम कराड यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने अशाप्रकारे अन्य महिलांना फसविले आहे का, याबाबत चौकशी, तपास सुरू आहे.