भिवडी शाळेत विद्यार्थ्यांना मिठाई वाटप
esakal June 17, 2025 03:45 AM

सासवड, ता. १६ : शैक्षणिक वर्ष २०२५- २६ चा प्रारंभ सोमवारी (ता. १६) झाला. शालेय शिक्षण विभागाने यंदाही ‘शाळा प्रवेशोत्सव’ साजरा करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या अनुषंगाने सर्वत्र विद्यार्थ्यांचे वाजत- गाजत, फुले व मिठाई वाटून जोरदार स्वागत करण्यात आले. भिवडी (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत हा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
विशेष म्हणजे, इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्यांच्या कुंकुम पावलांनी वर्गात प्रवेश करून त्यांचे अनोखे स्वागत केले. यावेळी सर्व मुलांचे औक्षण केले. त्यांना गुलाबाची फुले देण्यात आली आणि वर्गात प्रवेश करताना फुलांचा वर्षाव करत हा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. मुलांना बुंदी आणि मसालेभाताचे जेवण देण्यात आले. याशिवाय, सर्व विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी गणवेश आणि पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आली, ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
या सोहळ्याचे आयोजन तानाजी रिठे, वनिता टिळेकर, शरद बोबडे, अरुणा बोबडे या शिक्षक वृंदांनी केले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर भिंताडे, पुरंदर पंचायत समितीचे माजी सभापती रमेश मोकाशी, नाना वांढेकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ आणि पालक उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.