पुणे : कात्रज घाट परिसरात तीन तरुणांकडून तीन गावठी बनावटीची पिस्तुले, दोन मॅगझिन आणि नऊ जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या कॉप्स २४ पथकाने ही कारवाई केली.
यामध्ये एका सराईत गुन्हेगारासह दोघा तरुणांना अटक करण्यात आली आहे. तर अन्य एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सुमारे तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अंमलदार कृष्णा म्हस्के आणि सौरभ साळवे यांच्या तत्परतेमुळे शक्य झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जून रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गुन्हे शाखेच्या युनिट-दोनकडील कॉप्स २४ कात्रज मार्शल हे गस्त घालत असताना कात्रज घाटातील लक्ष्मी गॅरेजसमोर तीन तरुण एका दुचाकीसह संशयास्पद रीतीने उभे असलेले आढळले. पोलिसांनी त्यांना विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता, ते गोंधळून पळण्याचा प्रयत्न करू लागले.
या हालचालींवर संशय आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तपासणीत त्यांच्या कमरेच्या भागाजवळील फुगलेला भाग तपासल्यावर तीन गावठी पिस्तूल मॅगझिनसह, दोन अतिरिक्त मॅगझिन, नऊ जिवंत काडतुसे, तीन मोबाईल आणि एक दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अनिकेत संजय मालपोटे (वय २२, रा. सुतारदरा, दत्तनगर, कोथरूड) आणि निखिल मुकेश तुसाम (वय १९, रा. केळेवाडी, कोथरूड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. तर अन्य एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
या तिघांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट दोनचे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगावकर, पोलिस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांच्या पथकाने ही कारवाई केली. न्यायालयाने आरोपींना १८ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिला आहे.