- प्रशांत केणी
पहिल्यावहिल्या महिला महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या (डब्ल्यूपीएल) विजेतेपदावर पुणे वॉरियर्सने नाव कोरले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असलेली अनुजा पाटील पुण्याच्या विजेतेपदाची शिल्पकार ठरली.
बऱ्याचदा अंतिम सामने हे एकतर्फी ठरतात; परंतु हा सामना त्याला अपवाद ठरला. सोलापूर स्मॅशर्स जेतेपदाला गवसणी घालणार हे जवळपास निश्चित झाले होते; पण संघनायिका अनुजाच्या चमूला ते नामंजूर होते.
अनुजाने आधी फलंदाजीत ३० धावांचे योगदान दिले आणि नंतर अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर उंच फटके खेळण्याची क्षमता असलेल्या शाल्मली क्षत्रियला स्वत:च्याच चेंडूवर झेलबाद केले, तर शेवटच्या चेंडूवर स्वांजली मुळेला धावचीत केले. त्यानंतर पुणे वॉरियर्सने अभूतपूर्व जल्लोष साजरा केला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील लोकप्रिय क्रिकेटपटूंमध्ये गणना होणारी भारताची उपकर्णधार स्मृती मानधना, देशाच्या एकदिवसीय संघात समावेश असलेली तेजल हसबनीस तसेच अनुजा पाटील, किरण नवगिरे या अनुभवी क्रिकेटपटूंनी आपल्या दर्जाला साजेसा खेळ केला; पण आणखी बरेचसे गुणवान क्रिकेटपटू महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गवसले, हीच महिलांच्या महाराष्ट्र प्रीमियर लीगची पुंजी म्हणता येईल.
महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या पहिल्या अध्यायाच्या वेळी तीन संघांचा समावेश असलेली महिलांची लीग प्रायोगिक स्तरावर होणार होती; पण पावसामुळे ती होऊ शकली नव्हती. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी या वेळी मात्र महिलांच्या लीगची आपली संकल्पना प्रत्यक्षात उतरवली.
महिलांच्या महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये चार संघांचा समावेश होता. रायगड रॉयल्स आणि रत्नागिरी जेट्स साखळीतच गारद झाले; परंतु महिलांचे झालेले १३ सामने विलक्षण रंगतदार आणि प्रेक्षणीय ठरले.
यशोदा घोगरेने तेजलचा सीमारेषेनजीक पकडलेला झेल कौतुकास्पद ठरला. तसेच ईश्वरी अवसरेने सीमारेषेजवळ उत्तम झेल टिपला. सोलापूर स्मॅशर्सची शरयू कुलकर्णी भाव खाऊन गेली. तिने चक्क स्मृतीसारख्या दिग्गज क्रिकेटपटूला एक धावेवर बाद केल्यानंतर मैदानावर कोलांटीउडी घेत विजयाचा आनंद साजरा केला.
शरयू ही पूर्वाश्रमीची जिम्नॅस्टिकपटू म्हणून तिने हे कौशल्य दाखवले; परंतु संघ व्यवस्थापनाने तिला दुखापत होऊ नये म्हणून अशा रीतीने आनंद साजरा करू नये, असे निर्देश दिले. मग आणखी एका सामन्यात शरयूने सोलापूर संघाच्या विजयानंतर खिशातून एक चिठ्ठी काढत प्रेक्षकांना दाखवली.
‘लव्ह यू बेबी डेबो’ असा संदेश त्या कागदावर लिहिला होता. आपण लीग खेळत असताना भाच्याचा झालेला जन्म तिने अशा पद्धतीने साजरा केला. भक्ती मिरजकरचे क्षेत्ररक्षणही वाखाणण्याजोगे ठरले; परंतु क्षेत्ररक्षणात सर्वोत्तम ठरली, ती सोलापूर स्मॅशर्सची यष्टीरक्षक दामिनी बनकर (११ बळी). याशिवाय भक्ती मिरजकर, वैष्णवी शिंदे, स्वांजली मुळे, श्वेता माने यांनीही आपल्या क्षेत्ररक्षणाची अदाकारी पेश केली.
महिलांच्या लीगमध्ये गोलंदाजीत सर्वात लक्षवेधी ठरली, ती ‘परभणी एक्स्प्रेस’ म्हणून नावारूपास आलेली पुणे वॉरियर्सची चिन्मयी बोरपले. ‘पर्पल कॅप’धारक चिन्मयी अंतिम सामन्यात भलेही ती आपला प्रभाव दाखवू शकली नाही; परंतु संपूर्ण स्पर्धेत ५.१९च्या इकॉनॉमीने एकूण १३ बळी तिने मिळवले.
तीन किंवा त्याहून अधिक बळी मिळवण्याची किमया तिने तीनदा साधली. रत्नागिरी जेट्सच्या प्रियांका घोडकेने रायगड रॉयल्सविरुद्ध पाच बळी घेतले. हे पंचक साधणारी ती पहिलीच. तिच्या खात्यावर एकूण १० बळी जमा होते. सोलापूर स्मॅशर्सच्या आरती केदारने एकंदर नऊ बळी प्राप्त केले.
फलंदाजांमध्ये सोलापूर स्मॅशर्सच्या सलामीवीर ईश्वरी द्वयीने मजबूत भागीदाऱ्या करीत संघाच्या विजयासाठी पाया रचण्याचे कार्य इमानेइतबारे केले. २१ वर्षीय ईश्वरी सावकारने अंतिम सामन्यात २२ धावांचे योगदान दिले. याशिवाय सर्वाधिक २६९ धावा करताना ‘ऑरेंज कॅप’ संपादन केली.
तिची जोडीदार १५ वर्षीय ईश्वरी अवसरेने ११५ धावा काढल्या. सोलापूर स्मॅशर्सची कर्णधार तेजल हसबनीस आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. हेच तिने २५५ धावांच्या आपल्या कामगिरीतून सिद्ध केले. रत्नागिरी जेट्सची कर्णधार स्मृतीने पाच सामन्यांत ३०.४०च्या सरासरीने १५२ धावा केल्या.
पहिल्या सामन्यात डावाचा प्रारंभ करताना गौतमीसोबत ८५ धावांची दमदार सलामी नोंदवली. या वेळी स्मृतीचे ३५ धावांचे योगदान होते. याशिवाय दोन अर्धशतकेही तिने झळकावली. पुणे वॉरियर्सची ३४ वर्षीय श्वेता माने ही लीगमधील सर्वात वयस्क क्रिकेटपटू; परंतु १५२ धावांसह तिचे संघाच्या जेतेपदामधील योगदान अधोरेखित होते. पुण्याकडून सुहानी काहंदलची कामगिरीही (१४५ धावा) लक्षवेधी ठरली.
अनुजाचा प्रभावअष्टपैलूंमध्ये सर्वाधिक यशस्वी ठरली, ती अनुजा पाटील. रिक्षाचालकाच्या या कन्येने भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न केव्हाच साध्य केले आहे; पण राज्यातली लीग खेळताना तिच्यातील विजिगिशू वृत्तीचे उत्तम दर्शन घडले. गोलंदाजीत नऊ बळी आणि फलंदाजीत १४५ धावा हा तिचा पुण्याच्या यशातला सिंहाचा वाटा. तिच्याच संघाच्या खुशी मुल्लानेही १६६ धावा आणि चार बळी मिळवले.
सोलापूर स्मॅशर्समधील बीडच्या मुक्ता मगरेने नऊ बळी आणि १४२ धावा केल्या. अंतिम सामन्यात ४१ चेंडूंत ४० धावाही तिने केल्या; परंतु संघाला जेतेपद मिळवून देण्यात ती अपयशी ठरली. रायगड रॉयल्सची कर्णधार किरण नवगिरे ही पूर्वाश्रमीची अॅथलेटिक्सपटू. पुणे विद्यापीठाकडून तिने अनेक पदके जिंकली होती.
शेतकऱ्याची ही कन्या नंतर क्रिकेटकडे वळली आणि देशाकडून खेळली. ‘घूमर’ या चित्रपटात प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसलेल्या किरणने या स्पर्धेत तीन बळी आणि ११३ धावा केल्या. रत्नागिरी जेट्सच्या गौतमी नाईकने चमकदार कामगिरीचे प्रदर्शन केले. सामना जिंकून देण्याची क्षमता असलेल्या या २७ वर्षांच्या गौतमीकडून (१७३ धावा) महाराष्ट्राला मोठ्या अपेक्षा ठेवता येतील.
काय म्हणताहेत दिग्गज? किरण मोरे, माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूमहिला महाराष्ट्र प्रीमियर लीगचे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने उत्तम आयोजन केले. छोट्या-छोट्या गावातून मुली या व्यासपीठापर्यंत पोहोचल्या. इतक्या मोठ्या स्टेडियमवर खेळताना तसेच टीव्हीवर पाहणाऱ्या प्रेक्षकांचे दडपण त्यांच्यावर होते. महिलांच्या या लीगचा आदर्श महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने निर्माण केला. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुणवत्ता आहे, हेच या स्पर्धेतून दिसून आले. सलील अंकोला, माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूमहिलांच्या एमपीएलमध्ये रंगतदार सामने झाले. यात जशी अनुभवी खेळाडूंनी वर्चस्व गाजवले, तसेच अनेक गुणी खेळाडू उदयास आले. स्मृती मानधना, तेजल हसबनीस, किरण नवगिरे या भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंकडून नव्या खेळाडूंना बरेच काही शिकता आले. याचप्रमाणे १५ वर्षीय ईश्वरी अवसरेची फलंदाजी पाहण्याजोगी होती. तसेच ईश्वरी सावकार, चिन्मयी बोरपले यांनी चमकदार कामगिरी केली. महाराष्ट्राप्रमाणेच अन्य राज्यांमध्येही महिलांच्या लीग होत आहेत. या सकारात्मक लाटेमुळे मोठ्या प्रमाणात गुणवत्ता निर्माण होत आहे. सुलक्षणा नाईक, माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूमहाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने राबवलेला हा अप्रतिम उपक्रम आहे. यानिमित्ताने बऱ्याचशा युवा महिला क्रिकेटपटूंना आपली गुणवत्ता दाखवण्याचे व्यासपीठ मिळाले. या संधीचे सोने करीत पुढे महिलांच्या प्रीमियर लीगसाठी आपण सज्ज असल्याचे सिद्ध केले. ईश्वरी अवसरे, ईश्वरी सावकार, अदिती गायकवाड, शरयू कुलकर्णी आदी क्रिकेटपटूंची कामगिरी लक्षणीय ठरली. चिन्मयी बोरपलेने संपूर्ण स्पर्धेत आपली छाप पाडली. मुली देशासाठी किंवा राज्यासाठी खेळतात, तेव्हा त्यांना यथोचित मानधन मिळते; पण अशा प्रकारच्या लीगमुळे अनेक मुलींच्या अर्थकारणातही भर पडेल. त्यामुळे कुटुंबाचा भार त्या हिमतीने वाहू शकतील.एकंदरीत महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या आयोजनाचा उद्देश सार्थकी ठरला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण राज्यातील महिला क्रिकेटपटूंची गुणवत्ता यानिमित्ताने जोपासली गेली. खेळाडू, प्रशिक्षक, चाहते आणि पुरस्कर्ते या प्रत्येक बाबतीत लीगचे यश ठळकपणे दिसून येते.
येत्या काही दिवसांत देशांतर्गत क्रिकेट हंगामाला प्रारंभ होईल. या स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे हेच तारे चमकतील आणि पुढे देशाचे प्रतिनिधित्व करतील किंवा महिलांच्या प्रीमियर लीगमध्ये आपली कर्तबगारी दाखवतील.