धकादायक प्रकार! पाेषण आहार पुरवठ्याची पद्धती संशयास्पद: विक्रम पाचपुते; हिरडगाव येथील शाळेत आढळले कालबाह्य मसाले
esakal June 17, 2025 06:45 PM

श्रीगोंदे : उन्हाळ्याच्या सुट्या लागणार असताना तालुक्यातील शाळांना मार्च महिन्यात जवळपास तीन महिन्यांचा पोषण आहार पाठविण्यात आला. ही पद्धती संशयास्पद असून याबाबत सविस्तर माहिती संकलित करून या पोषण आहार पुरवठ्यातील त्रुटी दूर करण्यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा करणार आहोत, अशी माहिती आमदार विक्रम पाचपुते यांनी दिली. आमदार पाचपुते यांनी सोमवारी (ता.१६) दुपारी तालुक्यातील हिरडगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला प्रवेशोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट दिली. यावेळी त्यांनी पोषण आहाराची पाहणी केली असता त्यात काही कालबाह्य मसाले आढळून आले.

आमदार विक्रम पाचपुते म्हणाले, प्रवेशोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळांना भेटी देत होतो. हिरडगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आलो तेव्हा माध्यान्ह भोजनाची वेळ झाली होती. आम्ही पोषण आहाराची पाहणी केली. त्यावेळी त्यात काही कालबाह्य मसाले आढळून आले. ते मसाले वेळीच बाजूला काढून ठेवल्याचे शिक्षकांनी सांगितले. मात्र, हा प्रकार दुर्दैवी असून याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत.

ते म्हणाले, येथील शिक्षकांनी तत्परता दाखविल्याने कालबाह्य मसाले बाजूला काढण्यात आले. मात्र, काही ठिकाणी ते मसाले विद्यार्थ्यांच्या आहारात गेले असू शकतात. ही बाब अत्यंत गंभीर असून, याबाबत सविस्तर माहिती संकलित करीत आहोत. पोषण आहार पुरवठ्याच्या पद्धतीत काही त्रुटी असून, त्याबाबत आवाज उठवून त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करू. यावेळी गटशिक्षणाधिकारी कुसुम कानडी, सत्यजित मच्छिंद्र, मिलिंद दरेकर आदी उपस्थित होते.

शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी वेळापत्रक ठरवून किमान दररोज एका सदस्याने शाळेत जाऊन पोषण आहाराची दैनंदिन पाहणी करावी. दैनंदिन पाहणीची सुरुवात झाल्यास विद्यार्थ्यांना सकस व पोषक आहार देणे अधिक सोयीस्कर होईल.

- विक्रम पाचपुते, आमदार, श्रीगोंदे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.