देवदैठण : शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा असतो. मात्र, पिंपरी कोलंदर (ता. श्रीगोंदे) येथील चौफुला प्राथमिक शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजण पडले. जागामालकाने शाळा भरविण्यास विरोध केल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठत तेथे ठिय्या दिला.
या शाळेसाठी कै. भानुदास सदाशिव ओहोळ यांनी पंचवीस वर्षांपूर्वी आपल्या मालकीतील २ गुंठे जागा बक्षीसपत्राद्वारे दिली होती. त्यामुळे गावात शाळेची उभारणी झाली. पुढे शाळेतील मूलभूत सुविधांमध्ये वाढ करताना शौचालयासाठी जागेची आवश्यकता भासली, तेव्हा त्यांचे सुपुत्र अविदास आणि संजय ओहोळ यांनीही स्वमालकीची जागा शाळेच्या शौचालयासाठी विनामूल्य दिली. शौचालयाच्या कामासाठी शाळा परिसरात काही दिवसांपूर्वी खड्डा खोदण्यात आला. त्यात काही दिवसांपूर्वी गाय पडली. त्याची दुर्गंधी सुटल्याने ओहोळ कुटुंबीयांनी ही बाब ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, ग्रामपंचायतीकडून त्याची कुठलीही दखल घेण्यात आली नाही.
आज (ता.१६) शाळेचा पहिला दिवस होता. विद्यार्थी शाळेत आल्यावर ओहोळ कुटुंबाने ‘शाळा आमच्या जागेवर आणि त्रासही आम्हालाच,’ असा त्रागा करत शाळा भरविण्यास विरोध दर्शवला. परिणामी संतप्त पालकांनी मुलांना घेऊन थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठत तेथे ठिय्या दिला.यावेळी सरपंचांनी पालकांची समजूत काढली व लवकरात लवकर शौचालयाचे काम सुरू केले जाईल, असे सांगितले. त्यानंतर वर्ग भरविण्यात आले.
आमच्या वडिलांनी शाळेसाठी जागा दिली. शौचालयास जागा कमी पडत होती म्हणून आम्ही पुन्हा जागा देऊ केली. मात्र, ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारामुळे जागा देऊन चूकच झाल्याची भावना होत आहे.
- अविदास ओहोळ, जागामालक
दोनच दिवसांपूर्वी येथील कार्याचा पदभार मी घेतला आहे. दप्तरी माहिती घेतली असता स्वच्छ भारतअंतर्गत शौचालय मंजूर झाले आहे. संबंधित ठेकेदाराशी बोलणे झाले आहे. लवकरच काम मार्गी लागेल.
- योगिता गिरवले, ग्रामपंचायत अधिकारी, पिंपरी कोलंदर