Pune Rainy Season School Problem : चिखलवाट तुडवत शिक्षणासाठीचा प्रवास; वडगावमधील स्थिती; शाळेत जाताना विद्यार्थ्यांची कसरत
esakal June 18, 2025 10:45 PM

सिंहगड रस्ता: वडगाव येथील प्रयेजा सिटीसमोर व्हर्सेटाइल विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मातीचे ढीग टाकण्यात आले आहेत. सतत पडत असलेल्या पावसामुळे रस्ता चिखलमय झाला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना या चिखलमय रस्त्यावरून ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. एखादा अनर्थ घडण्याअगोदर महापालिका प्रशासनाने तातडीने योग्य त्या उपायांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.

सतत पडणाऱ्या पावसाने व्हर्सेटाइल विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिखल झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना चिखलातून ये-जा करावी लागते, तसेच चिखलामुळे रस्ता निसरडा झाल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी पाणी साचत आहे. या साचलेल्या पाण्यातून आणि मातीच्या ढिगातून मार्ग काढत चिखलतोड करत विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागत आहे.

विद्येच्या माहेरघरात शाळेच्या दारातच अशी माती टाकल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. येथील माती काढण्यात यावी आणि रस्ता नीट करावा, अशी मागणी शाळेने महापालिका प्रशासन, तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली होती. मात्र, दोन्ही विभागांकडून एकमेकांवर टोलवाटोलवी केली गेली आणि प्रत्यक्षात रस्ता कोणीही केला नाही. या सगळ्यात मात्र विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ होत आहे. यावर प्रशासनाकडून तत्काळ कार्यवाही होणे गरजेचे असल्याचे पालकांनी नमूद केले आहे.

प्रयेजा सिटीसमोरील व्हर्सेटाइल विद्यालयात ये-जा करण्यासाठी असलेल्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी मातीचे ढीग टाकण्यात आल्याने पावसात मोठ्या प्रमाणात चिखल तयार झाला होतो. परिणामी आणि त्यांच्या पालकांना ये-जा करणे अवघड होत आहे. यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

- दीप्ती अभ्यंकर, पालक, व्हर्सेटाइल विद्यालय

नर्सरी ते बारावी असे शाळेचे वर्ग आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांची ने-आण करण्यास अवघड झाले आहे. रस्त्यात मातीचे ढीग टाकले आहेत, त्यामुळे रस्ता अडवला गेला आहे, तसेच पावसामुळे त्याचा चिखल झाला आहे. याबाबत आम्ही वारंवार महापालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याशी पत्रव्यवहार केला, परंतु त्यावर कोणीही कार्यवाही करत नाही, या सगळ्या प्रकारात विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

-अम्रिता पाटील, मुख्याध्यापिका, व्हर्सेटाइल

वडगाव येथील प्रयेजा सिटीसमोरील रस्त्याच्या दुरुस्तीबाबत संबंधित ठेकेदाराला माहिती देण्यात आली असून, पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

-पंकज प्रसाद, व्यवस्थापक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.