देगलूर - तालुक्यातील वन्नाळी येथील युवकाचा विहिरीत पोहताना विजेचा शॉक लागून करून अंत झाल्याची दुर्दैवी घटना बुधवार ता. १८ रोजी दुपारी घडली. वन्नाळी येथील मंगेश बालाजीराव पाटील (वय २१ वर्ष) याने मित्रांसमवेत वन्नाळी आणि चैनपुर शिवारातील भुजंग दशरथराव पाटील यांच्या विहिरीत बुधवारी ता. १८ रोजी दुपारी पोहायला गेले होते.
सर्वच मित्र पोहण्यासाठी विहिरीत उतरले इतर मित्रांना विजेचा शॉक लागत असल्याची जाणीव होताच ते विहिरीतून वर आले. मात्र मंगेश पाटील याला विहिरीत विजेचा जबर शॉक लागल्यामुळे त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. याची माहिती मित्रांनीच गावात दिल्यानंतर गावकऱ्यांनी अपघात स्थळी धाव घेत मंगेशला पाण्यातून वर काढले.
परंतु तोपर्यंत मंगेशचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गावकऱ्यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे आणण्यात आला. रात्री उशिरा त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर रात्री उशिरा वन्नाळी येथे त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मंगेश पाटील हा नायगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. वनाळी येथील माजी सरपंच विठ्ठलराव पाटील यांचा तो नातु होता. त्याच्या अकाली निधनाने कुटुंबासह वन्नाळी गावावर शोककळा पसरली आहे.
या घटनेचा पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल परशुराम हिंगोले हे करीत असल्याचे सांगण्यात आले.