Aadul Crime : भरदिवसा धाडसी चोरी! चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद; दहा लाखाचा माल लंपास
esakal June 19, 2025 07:45 AM

आडुळ - घरात कोणी नसल्याची संधी साधुन अज्ञात दुचाकीस्वार दोन चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले दिड लाख नगद, दहा तोळे सोने व चांदी असा अंदाजे दहा लाख रुपये किंमती भरदिवसा धाडसी चोरी करून पोबारा केल्याची घटना बुधवारी (ता. १८ ) रोजी दुपारी १:४५ ते दोन वाजेच्या दरम्यान आडुळ (ता. पैठण ) येथील मोमीनपुरा भागात घडल्याने गावात घबराटीचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

नजीर जमाल शेख राहणार एकतुनी ता. पैठण (हल्ली मुक्काम आडुळ) हे येथील रहेमानिया मशिद जवळ मोमीनपुरा येथे कुटुंबासह राहतात. ते स्वतः ड्रायव्हर असून मुलगा कदिर शेख याचे येथील ग्राम पंचायत कार्यालयासमोर कापड दुकान आहे तर पत्नी गृहणी आहे.

बुधवारी (ता. १८ ) रोजी नजीर शेख यांच्या पत्नी मुन्नीबी शेख या नातेवाईक आजारी असल्याने सुन व मुली सह छत्रपती संभाजीनगर येथे दवाखान्यात गेले होते. तर मुलगा कदिर हा नेहमी प्रमाणे दुकानात होता व नजीर शेख हे कामानिमित्त बसस्थानकावर होते.

याच संधीचा फायदा घेत अज्ञात दुचाकी स्वार दोन चोरट्यांनी त्यांच्या घरासमोर दुचाकी उभी करून एकाने घराचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला व कपाटात ठेवलेले दिड लाख रुपये नगद, अंगठी, गळ्यातील चैन, रानीहार, नेकलेस, कानाचे हेरिंग, पायातील पैंजण असे अंदाजे दहा तोळे सोने व चांदी असा दहा लाख रुपये किंमतीची धाडसी चोरी करून घटनास्थळावरून पोबारा केला.

यानंतर थोड्यावळाने नजीर शेख हे घरी गेले असता त्यांना घर उघडे दिसले. त्यांनी घरात प्रवेश केला असता त्यांना कपाटातील सर्व सामान अस्तव्यस्त दिसल्याने त्यांच्या लक्षात आले की, चोरी झाली म्हणून त्यांनी शेजारी पाजारी यांना बोलावले. मात्र तो पर्यंत चोरटे पसार झाले होते.

घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन पंडित, पोलिस उपनिरिक्षक महादेव नाईकवाडे, रणजितसिंग दुलत, विलास काकडे, संतोष चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यानंतर श्वानपथक व ठसे तज्ञ यांना पाचारण करण्यात आले होते. या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात घेण्यात आली असून पुढिल तपास पाचोड पोलिस करित आहेत.

चोरटे सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद

येथील रहेमानिया मशिद येथे लावण्यात आलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात सदरिल दुचाकीस्वार चोरटे तोंडाला रुमाल बांधलेले दोन जण कैद झाले असुन घरात प्रवेश करतांना व बाहेर येतांना दिसत आहेत. आता पोलिस विविध दिशेने तपास करित आहेत.

हेर ठेवून चोरी; मागे ही कापड दुकान जाळण्याचा प्रयत्न

चोरट्यांनी हेर ठेवून घरात कोणीच नसल्याचा फायदा घेत चोरी केली. त्यांना दागिने व रोख रक्कम कुठे ठेवली आहे हे देखील कल्पना असावी कारण त्यांनी इतर घरातील झाडाझडती न घेता थेट ज्या कपाटात दागिणे ठेवले आहे तेच घर उघडले होते. तर गेल्या फेब्रुवारीत कदिर चे लग्न झाल्याने सुनेचे सर्व दागिने यात होते. या अगोदर ही कदिर यांची कापड दुकान अज्ञातांनी जाळण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यावेळी सुदैवाने आग शटरच्या आतपर्यंत गेली नसल्याने दुकान वाचली होती.

अज्ञात महिलांनी केली कापड दुकानात चोरी

काल मंगळवार चा आडुळ येथील आठवडी बाजार असल्याने कापड दुकानात गर्दी असते याचा फायदा घेत काल अज्ञात चार ते पाच महिलांनी येथील अंकूश खरात व अब्दुल शेख यांच्या कापड दुकानात भर दिवसा चोरी करून पोबारा केली. ही घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने उघडकीस आली मात्र तो पर्यंत सदरील चोरटया महिलांनी घनास्थळावरून पोबारा केला होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.