Evil Eye History: ‘एव्हिल आय’चा ट्रेंड जोरात, ५००० वर्षांचा आहे इतिहास
Marathi June 19, 2025 01:25 PM

एव्हिल आय हा शब्द सध्या अनेकदा कानावर पडतो. अगदी मेसेज करताना सुद्धा एव्हिल आयचा ईमोजी वापरला जातो. इतकाच काय तर सर्वत्र याच एव्हिल आयची फॅशन पाहायला मिळते. ब्रेसलेट, ज्वेलरी अगदी मंगळसूत्रामध्येही आता एव्हिल आयच्या डिझाईनची फॅशन सुरू आहे. मात्र हे एव्हिल आय म्हणजे नेमके काय? तुम्हाला माहित आहे का? वाईट नजरेपासून बचावासाठी हे एव्हिल आय प्रतीक मानले जाते. पण सर्वात विशेष म्हणजे या एव्हिल आयला तब्बल ५००० वर्षांचा इतिहास आहे.

भारतात वाईट नजरेपासून बचावासाठी अनेक पारंपरिक आणि धार्मिक उपाय केले जातात. जसे की काळा धागा बांधणे, लिंबू आणि हिरव्या मिरच्या लटकवणे, लाल मिरच्या जाळणे, ताबीज बांधणे, मीठ- मोहरी ओवाळून टाकणे. मात्र त्या पलीकडे आता नजर लागू नये म्हणून एव्हिल आयचा ट्रेंड जोरात आहे. निळ्या रंगाचे हे प्रतीक असते.

असा आहे एव्हिल आयचा इतिहास:
सीरियातील टेल ब्राक येथे उत्खननादरम्यान जिप्सम अलाबास्टर या दगडापासून बनवलेल्या डोळ्यांच्या शिल्पाकृती सापडल्या आणि त्या ३५०० ईसापूर्व काळातील असल्याचे मानले जाते. ‘हमजा’ हे एक हातातील ब्रेसलेटप्रमाणे असते ज्यामध्ये निळ्या रंगाचे डोळ्यासारखे चिन्ह असते. आधुनिक ग्रीसमध्ये याला ‘माटी आँख’ म्हणून ओळखले जाते. मध्य पूर्व आणि तुर्कीच्या बहुतेक भागात, याला अरबी भाषेत ‘अल-ऐन’ असेही म्हणतात. त्याचा इतिहास सुमारे ५००० वर्षे जुना आहे. हे चिन्ह अनेक धर्म आणि संस्कृतींमध्ये अस्तित्वात आहे, परंतु यहुदी, इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मात ते सर्वात जास्त प्रचलित आहे.

असे तयार झाले एव्हिल आय:
तुर्की आणि ग्रीक संस्कृतीत अशी मान्यता आहे की एखाद्याची खूप प्रशंसा केल्यावर त्याला नजर लागू शकते. त्यामुळे असे चिन्ह तयार केले ज्याला तुर्की ‘आय बीड’ म्हणूनही ओळखले जाते. त्यात निळ्या रंगात एक डोळ्याचा आकार दिसतो. आजही हे ग्रीक संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. ज्या गोष्टींना नजर लागण्याची भीती असते तिथे हे चिन्ह वापरले जाते.

हे एव्हिल आयचे प्रतीक नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यास आणि दूर करण्यास सक्षम असल्याचे मानले जाते. ज्या व्यक्तीने हे घातले असेल तो नकारात्मक गोष्टींपासून दूर राहतो असेही म्हंटले जाते. मात्र कितपत सत्य आहे हे सांगणे कठीण आहे. असे असले तरीही आजही लोक कोणत्या ना कोणत्या प्रकारे हे एव्हिल आय त्यांच्या जीवनशैलीत समाविष्ट करताना दिसतात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.