पुणे - पत्नीला अपशब्द बोलल्याच्या कारणावरून पतीने एकावर हत्याराने वार करून खून केला. ही घटना नऱ्हे गावात मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात पतीवर गुन्हा दाखल केला आहे.
राजू दादू आरू (वय ४०, रा. गोंदवणे नाका, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत राजेंद्र गायकवाड (वय ६०, रा. धायरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल अशोक जाधव (वय ३८, रा. गोंदवणे रस्ता, श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू आरू याने जाधव याच्या पत्नीबाबत अपशब्द वापरले होते. त्यामुळे रागाच्या भरात जाधव याने आरू याच्यावर हत्याराने वार केला. तसेच, डोक्यात स्टीलची बादली आणि कुकरच्या झाकणाने मारहाण केली. यात गंभीर जखमी झाल्याने आरू याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.