भारतीय परंपरेत दागिने हे केवळ सौंदर्यवर्धक नसून त्यांच्यामागे वैदिक, आयुर्वेदिक आणि शरीरशास्त्रीय कारणं आहेत. शरीरातील विशिष्ट नाड्यांवर (nerve points), मेरुदंडीय उर्जांवर आणि चक्रांवर यांचा प्रभाव पडतो. हे दागिने दीर्घकाळ वापरल्यास शारीरिक व मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो, असं आयुर्वेद आणि नाडीशास्त्र सांगतात.
हे मला समजून घेणं अतिशय गरजेचं वाटलं, याचं कारण म्हणजे ऐतिहासिक भूमिका करत असताना भरपूर दागिने परिधान करण्याची वेळ येते. प्रत्येक स्त्रीला नाजूक मॉडर्न किवा पारंपारिक अशा कुठल्या ना कुठल्या दागिन्यांचं आकर्षण असतं. आपल्या संस्कृतीमुळे आणि सणावारांमुळे नवनवीन दागिने बाजारात येत असतात.
मलाही दागिने परिधान करायला प्रचंड आवडतात; पण जोडवी म्हटलं, की वैताग येतो. शूट दरम्यान मी बऱ्याचदा विचारायचे, ‘हे घातलंच पाहिजे का?’ मला कंटाळा यायची कारणं गमतिशीर होती- कारण पायातून सतत पडत राहतं ते त्रासदायक वाटायचं; पण मग अलीकडेच माझ्या वाचनात हे पारंपरिक दागिने का बरं घालत असतील हे आलं.
आपली भारतीय परंपरा किती कमाल आहे हे लक्षात आलं. आत्ता जोडवी हा सुवासिनीसाठी महत्वाचा दागिना मानला जातो- याचा उपयोग सौंदर्यासाठी नव्हता तर धार्मिक, सामाजिक आणि आरोग्यासाठी होता. जोडवी ही शक्यतो चांदीत घालण्याला मान्यता आहे. चांदी हा थंड प्रवृत्तीचा धातू आहे. शरीरातील उष्णता नियंत्रण करत असल्याचं आयुर्वेद मानतं.
जोडवी पायातील विशिष्ट नाड्यांवर सौम्य असा दाब टाकतात. यामुळे रक्ताभिसरण सुरळीत राहतं आणि थकवा कमी येतो. पूर्वी घरातली कामं भरपूर असायची; पण नैसर्गिकरीत्या आराम या जोडव्यांमुळे मिळायचा असं म्हटलं जातं. आजकाल विविध डिझायनर्सची ऑक्सिडाइज्ड रंगीबेरंगी खडे लावलेली जोडवी मिळतात. एरवीसुद्धा इंडोवेस्ट्रर्न लूक देणारी जोडवी सुंदर स्टाईल स्टेटमेंट ठरू शकतात.
अशीच बाब कर्णफुलं आणि झुबे यांच्याबाबत. कानाच्या लोबमध्ये शरीरातील महत्त्वाची नाडी असते. ती प्रजनन शक्तीशी संबंधित आहे. मेंदूतील विचारशक्ती आणि मानसिक संतुलन यामुळे सुधारतं. हे एक प्रकारचं ॲक्युप्रेशर असतं. कुंकू आपण आज्ञा चक्रापाशी लावतो- ज्यामुळे एकाग्रता, मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. कुंकू लावल्यानं कपाळामागील विशिष्ट ग्लँडसुद्धा सक्रिय होते.
तसंच नाकाच्या बाजूला असलेली नाडी प्रजनन अवयवाशी संबधित आहे. त्यामुळे प्रसूती वेदना कमी होतात, मासिक पाळी नियमित राहण्यास मदत होते असं म्हटलं गेलं आहे. म्हणूनच बहुदा पूर्वीच्या काळी अशा मोठमोठ्या नथी वापरल्या जायच्या. थोडक्यात काय, तर दागिने परिधान करण्याची परंपरा विज्ञानाशी, आरोग्याशी आणि सौंदर्याशी जोडलेली आहे.
या गोष्टी नक्की करा
१. परंपरेला मॉडर्न टच द्या
पारंपरिक झुबे, चोकर किंवा नथ यांसारख्या दागिन्यांना वेस्टर्न किंवा फ्युजन कपड्यांबरोबर मिक्स करा. उदाहरणार्थ, धोती पॅन्टवर मोठा चोकर किंवा कुर्तीसोबत ऑक्सिडाइज्ड झुबे घालून हटके लूक तयार होतो.
२. ‘Less is More’ फॉर्म्युला वापरा
जर नेकलेस मोठा आणि ठसठशीत असेल, तर कानात छोटे झुबे किंवा साध्या टिकलीचा वापर करा. यामुळे बटबटीतपणा टाळता येतो आणि लूक अधिक सुसंगत आणि आकर्षक दिसतो.
३. रंगसंगती जुळवा
दागिन्यांचा रंग किंवा स्टोन पोशाखाशी जुळवून निवडा. सोनं, चांदी, कुंदन, किंवा मीनाकारी यांचा उपयोग साडी, लहेंगा किंवा कुर्तीच्या रंगानुसार केल्यास सौंदर्य खुलून येतं.
४. पारंपरिक दागिन्यांसोबत हेअरस्टाइल आणि मेकअप जुळवा
जसं मोठ्या झुब्यांबरोबर बन किंवा वेणी शोभून दिसते, तसंच ठसठशीत नथ घालायची असल्यास सटल मेकअप ठेवा. हेअरस्टाईल, बिंदी आणि ड्रेस यांचं एकत्रित कोऑर्डिनेशन फार महत्त्वाचं आहे.