Maharashtra Express : छगन भुजबळांच्या पाठपुराव्याला यश; महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये एलएचबी डबे
esakal June 19, 2025 09:45 PM

येवला- कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली आहे. आधुनिक लिंक हाफमन बुश डब्यांमध्ये रूपांतर केले आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा येवल्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील या मार्गावर छोट्या स्टेशनवरून बसणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुकर झाला आहे.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेसला सुधारित एलएचबी डबे जोडताना स्लीपर कोच डबे पूर्वीप्रमाणेच १० ठेवून त्या सर्वांचे रूपांतर एलएचबी डब्यांमध्ये करण्याची मागणी रेल्वे मंत्र्यांकडे केली होती. त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्र एक्स्प्रेसचे एलएचबी डब्यांमध्ये रूपांतर करताना स्लीपर डबे १० वरून थेट दोन न करता सात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे एकूण बर्थची संख्या पूर्वीइतकीच उपलब्ध झाली आहे. या गाडीला १८ नवीन एलएचबी कोच लावल्याने रेल्वेला आणखी गती मिळणार आहे.

या गाडीतील सर्वच्या सर्व जुने रेक बदलण्यात आले असून, ते आधुनिक लिंक हाफमन बुश डब्यांमध्ये रूपांतरित करण्यात आले आहेत. या बदलामुळे पूर्वीपेक्षा अधिक आरामदायी, सुरक्षित, सुकर आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव येवलेकर प्रवाशांना घेता येणार आहे. या रेल्वेगाडीची संरचना आता एक द्वितीय वातानुकूलित कोच, चार तृतीय वातानुकूलित कोच, सात शयनयान कोच, चार सामान्य द्वितीय श्रेणी कोच, एक सामान्य द्वितीय श्रेणी कोच, एक जनरेटर कार अशी असणार आहे.

प्रवाशांकडून स्वागत

वजनाला हलके आणि जास्त आसनक्षमता, स्वच्छ स्वच्छतागृहे असलेले हे नवीन एलएचबी कोच लावल्याने रेल्वेला आणखी गती मिळणार आहे. या गाडीतील सर्वच्या सर्व जुने रेक बदलण्यात आले असून, ते आधुनिक एलएचबी डब्यांमध्ये रूपांतरित करण्यात आले आहेत. या बदलामुळे पूर्वीपेक्षा अधिक आरामदायी, सुरक्षित, सुकर आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव प्रवाशांना घेता येणार आहे. या नव्या कोचमुळे येवला मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांना आता अधिक आरामदायी व सुरक्षित प्रवास यामुळे करता येणार असल्याने या बदलाचे प्रवाशांनी स्वागत केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.