MHADA e-Auction : म्हाडातर्फे गाळ्यांचे होणार ई-लिलाव, रिक्त सदनिका प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर वाटप
esakal June 19, 2025 09:45 PM

पुणे : १८ : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या वतीने (म्हाडा) पुण्यासह सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील ५२ अनिवासी गाळे आणि २८ कार्यालयीन गाळ्यांचे ई-लिलाव पद्धतीने वितरित करण्यात येणार आहे. इच्छुकांनी www.eauction.mhada.gov.in व संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करावा, असे आवाहन मंडळाचे मुख्य अधिकारी यांनी केले.

म्हाडाच्या पुणे विभागामार्फत १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजना आणि २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील सोडतीनंतर मागणी अभावी रिक्त राहिलेल्या सदनिका विकसकाकडून प्राप्त अहवालानुसार प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर वाटप करण्याचे नियोजित आहे. वाटपामध्ये पारदर्शकता ठेवण्याच्या हेतूने सर्वसाधारण प्रवर्गामधील गरजू आणि पात्र अर्जदारांना सदनिका वितरित करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने खालील संकेतस्थळावर अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे.

विकसकांकडून सोडतीनंतर विक्रीअभावी शिल्लक सदनिका जसजशा उपलब्ध होतील, तस तशा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर सर्वसाधारण प्रवर्गामधील गरजू व पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्याची प्रक्रिया सुरू राहील. गरजू व पात्र लाभार्थ्यांनी या संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करून उपलब्ध सदनिकांसाठी अर्ज करावा.

प्रधानमंत्री आवास योजना- २ (शहरी) अंतर्गत म्हाडाच्या पुणे विभागामार्फत नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी गृहनिर्माण प्रकल्प राबविण्याचे नियोजित आहे. या योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या सदनिकांसाठी लाभार्थ्यांची नोंदणी व निवड प्रथम करावयाची असल्याने PMAYmis2 2024/Auth/Login.aspx या युनिफाइड वेब पोर्टलवर सदनिका घेण्यास इच्छुक असणाऱ्या अर्जदारांनी नोंदणी करावी. सदनिका वितरणाची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून देकार पत्र हे उपमुख्य अधिकारी, म्हाडा यांच्या डिजिटल स्वाक्षरीने ऑनलाइन पद्धतीने लाभार्थ्यांच्या लॉग-इन आयडीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे यांनी दिली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.