पुणे, ता. १९ : राज्य शासनाने फुरसुंगी-उरुळी देवाची नगर परिषदेसाठीच्या आकृतिबंधास मान्यता दिली आहे. त्यानुसार मुख्याधिकारी (गट-अ) यांच्यासह अभियांत्रिकी सेवा, नगररचनाकार, स्वच्छता निरीक्षक आदींसह एकूण ५९ पदांना मान्यता मिळाली आहे. या निर्णयामुळे नगर परिषदेसाठी मनुष्यबळ उपलब्ध झाल्याने कामकाजास गती मिळणार आहे.
फुरसुंगी-उरुळी देवाची नगर परिषदेसाठी २०११ची जनगणना ग्राह्य धरण्यात आली आहे. त्यानुसार ७५ हजार ४६५ इतकी लोकसंख्या ग्राह्य धरून त्यासाठी एकूण ५९ पदांचा आकृतिबंध निश्चित केला आहे. त्यासाठी वार्षिक चार कोटी ८२ लाख इतके अनुदानदेखील मंजूर केले आहे, तसेच या नगर परिषदेसाठी ‘गट अ’ वर्गातील मुख्याधिकारी संवर्गातील एक पद निर्माण करण्यात आले आहे. नगर विकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
नगर परिषदेसाठी करवसुली अधिकारी, अग्निशामक सेवा, स्थापत्य, विद्युत आणि संगणक सेवांसाठी अभियांत्रिकीची नऊ पदे यांसह बांधकाम परवानगीसाठी नगररचनाकार आणि विकास सेवा विभागासाठी तीन पदे मंजूर केली आहेत. त्यामध्ये दहा लिपिक पदे, एक प्रयोगशाळा सहाय्यक, तीन वायरमन आणि शिपाई अशा २५ पदास मान्यता देण्यात आली आहे.