पिरंगुट, ता. १९ : मुळशीत पावसाने थैमान घातले असून जनजीवन विस्कळित झाले आहे. संततधार आणि जोमदार पावसाने मुळा, मुठा, वळकी आदी नद्या बरोबरच अन्य सर्व ओढ्यांना व नाल्यांना पूर आलेले आहेत. त्यामुळे पुराचे पाणी थेट रस्त्यावर आल्याने अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत. त्यामुळे दळणवळणाचे पर्याय ठप्प झालेले आहेत.
घोटावडे, रिहे खोरे, पिरंगुट परिसर, मुठा खोरे तसेच लवासा परिसरातील रस्त्यांवरून पाण्याचे लोट वाहत आहेत. मुळा नदी दुथडी भरून वाहत असल्याने भरे, लवळे, चांदे, नांदे तसेच माण भागातील काही ठिकाणचे कृषीपंप पाण्यात बुडाले आहेत. लवळे भरे या रस्त्यावरील कळमकरवस्ती येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. घोटावडे येथील शेळकेवाडी ते माण दरम्यानच्या रस्त्यावरून वाहणारे पाणी शेळकेवाडीतील घरे व दुकानांत शिरले असल्याची माहिती भाजपचे मुळशीचे पदाधिकारी रामचंद्र देवकर यांनी दिली. पुणे-कोलाड रस्त्यावर घोटावडे फाटा येथे पाणी साचून राहिल्याने तळ्याचे स्वरूप आलेले असून वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. कासार आंबोलीतील सुतारवाडीते शिंदेवाडी दरम्यानच्या पुणे कोलाड रस्त्यालाही ओढ्याचे स्वरूप आले आहे. या रस्त्यावर वाहने चालविताना वाहनचालकांना कसरत करावी लागत असल्याचे कासार आंबोलीचे माजी सरपंच गणेश सुतार यांनी सांगितले. उरवडे मुकाईवाडी रस्त्यावर चार ठिकाणी मोऱ्या ओलांडून पाणी रस्त्यावर आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याचे पिरंगुटचे माजी ग्रामपंचायत सदस्य भानुदास गोळे यांनी सांगितले.
04478