पालीत दत्तक पालक योजनेला प्रतिसाद
esakal June 20, 2025 02:45 AM

पालीत दत्तक पालक योजनेला प्रतिसाद
पाली, ता. १९ (वार्ताहर) ः सुधागड तालुका मराठा समाज संस्थेच्या वतीने सर्व जाती-धर्माच्या गरजू, होतकरू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दत्तक पालक योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा शुभारंभ सुधागड तालुका मराठा समाज अध्यक्ष धनंजय साजेकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच सुधागड तालुका मराठा समाज भवन पाली येथील स्व. स. स. साजेकर सभागृहात मोठ्या उत्साहात करण्यात आला.
या वेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व आर्थिक मदत म्हणून धनादेश देण्यात आले. इयत्ता पाचवी व सहावीच्या एकूण नऊ विद्यार्थ्यांना गाईडचा सेट, तसेच स्कूल बॅग व प्रत्येकी चार हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. इयत्ता सातवीच्या पाच विद्यार्थ्यांना पाच हजार रुपयांचा धनादेश तर इयत्ता आठवीच्या पाच विद्यार्थ्यांना सहा हजार रुपयांचा धनादेश, इयत्ता नववी ते बारावीच्या २१ विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचा धनादेश तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला स्कूल बॅग आणि दोन फळझाडे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. संस्थेच्या वतीने व दत्तक पालकांच्या मदतीने एकूण ४० विद्यार्थ्यांना याप्रसंगी मदत करण्यात आली असून त्यांना दत्तक घेण्यात आले आहे. या वेळी शर्मिला पाटील, वैकुंठ पाटील, सुरेश जाधव, सुधीर उतेकर आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच सिद्धी सावंत या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त करताना मराठा समाजाचे अध्यक्ष धनंजय साजेकर यांचे आभार व्यक्त केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.