तलासरीमध्ये प्लॅस्टिकविरोधात मोहीम
esakal June 20, 2025 02:45 AM

कासा, ता. १९ (बातमीदार) : तलासरी नगर पंचायतीअंतर्गत शहरात स्वच्छता, प्लॅस्टिक बंदी आणि फेरीवाल्यांचे रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी मोहीम राबवण्यात येत आहे. शहरात स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या असून पर्यावरण संरक्षणासाठी प्लॅस्टिक बंदीसाठी कठोर पावले उचलण्यात आली आहेत. तसेच शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रस्त्यालगत दुकाने थाटणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांमधूनदेखील नगर पंचायतीच्या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे निदर्शनास येत आहे.

तलासरी नगर पंचायत हद्दीतील बाजारपेठ परिसरात स्वच्छता करून ठिकठिकाणी कचरापेट्या ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच शहरात प्लॅस्टिक पिशवी वापरावर बंदी करण्यात आली असून यासाठी कारवाईची मोहीम राबवण्यात आली आहे. दुकानदारांकडून प्लॅस्टिक पिशवीऐवजी कापडी पिशवी वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

शहरातील तलासरी उड्डाणपूल चार रस्ता ते परुळेकर महाविद्यालय परिसरातील बाजारपेठेत अनेक दुकाने रस्त्यालगत आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. यामुळे पादचाऱ्यांनादेखील मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतो. प्रसंगी अपघातालादेखील सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने नगर परिषदमार्फत रस्त्यालगत येणाऱ्या दुकानदार, फेरीवाल्यांना सूचना देऊन दुकाने मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुकाने मागे न घेतल्यास नगर पंचायतीमार्फत कठोर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

नगर पंचायत कर्मचारी वैभव जाधव यांनी सांगितले, की तलासरी नगर पंचायत हद्दीत स्वच्छता आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने नगर पंचायतीमार्फत मोहीम सुरू आहे. नियमावलींचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्याची सूचना देण्यात आली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.