हिंदुस्थानी क्रिकेटमधील दिग्गज विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविचंद्रन अश्विनशिवाय हिंदुस्थानी क्रिकेटच्या नव्या पर्वाचा शुभ आरंभ करण्यासाठी नव्या दमाचा शुभमन गिल आपल्या युवा संघासह सज्ज झालाय. इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत अॅण्डरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठी हा लढा सुरू होणार असून या मालिकेद्वारे शुभमन गिलच्या (शुगि)नेतृत्वाखाली हिंदुस्थानी क्रिकेटचे सुगीचे (शुभमन गिल) दिवस आणण्याच्या ध्येयानेच सारे हेडिंग्ले मैदानावर उतरणार आहेत. मालिकेची सुरुवात दणक्यातच करायची, अशा निर्धारासह हिंदुस्थानचे नवे छावे मैदानात प्रतिस्पर्ध्यांना आपला दम दाखवण्यासाठी उत्सुक आहेत.
दीड महिन्याच्या दौऱ्यात नव्या दमाच्या हिंदुस्थानी संघाला नव्या नेतृत्वासह काही नवे आणि काही अनुभवी खेळाडूंना इंग्लंडच्या दमदार संघाशी मुकाबला करावा लागणार आहे. कारण आजवर इंग्लंड भूमीवर हिंदुस्थानचा संघ केवळ तीनदाच विजेता ठरलाय. 1971 साली अजित वाडेकरांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने इंग्रजांच्या राज्यात पहिल्यांदा तिरंगा फडकावत कसोटी मालिका जिंकली होती. मग 1986 साली जग जिंकणाऱ्या कपिल देवने हिंदुस्थानला 2-0 असे दिमाखदार यश मिळवून दिले होते. मात्र त्यानंतर तब्बल दोन दशकांनंतर 2007 साली राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने इंग्लंड मालिकेत हरवण्याचा पराक्रम केला. जे या तिघांनी केलेय, त्याचीच पुनरावृत्ती करण्याचे स्वप्न शुभमनने उराशी बाळगले आहे. पण विराट, रोहित आणि अश्विनच्या अनुपस्थितीत शुभमनला सारंकाही नव्याने उभारायचेय. इंग्लंडच्या तुलनेत गिलचा संघ काहीसा अननुभवी नक्कीच आहे, पण दमदार खेळाडूंमुळे कमकुवत नक्कीच नाही.
कसोटी नवे अग्निपरीक्षा
पाच कसोटी सामन्यांची मालिका ही हिंदुस्थानच्या नव्या नेतृत्वाची कसोटी नसून अवघ्या संघासाठी अग्निपरीक्षाच आहे. कारण आजवरचा इतिहास पाहिला तर इंग्लंडला त्यांच्या भूमीत हरवणे हिंदुस्थानी संघाला नेहमीच जड गेलेय. त्यातच दिग्गजांशिवाय खेळत असलेल्या गिलच्या संघाला बेन स्टोक्सच्या ‘बॅझबॉल’ आक्रमक शैलीचा सामना करावा लागणार आहे ते वेगळे. त्यामुळे गिलच्या नेतृत्वासाठी इंग्लंडविरुद्धची प्रत्येक कसोटी ही अग्निपथावरून अनवाणी चालण्यासारखीच असेल. यात कुणाचे पाय पोळणार आणि कोण सहजगत्या धावणार, हे लीड्सपासूनच कळू लागेल.
यावर असेल सर्वांची नजर
अॅण्डरसन-तेंडुलकर ट्रॉफीचे अनावरण
हिंदुस्थान-इंग्लंडदरम्यानच्या कसोटी मालिकेचे नाव पतौडी ट्रॉफी असणार नाहीये हे स्पष्ट झाले आहे. कारण हिंदुस्थानचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अॅण्डरसन यांच्या नावाने या मालिकेचे आता अॅण्डरसन–तेंडुलकर ट्रॉफी’ असे नामकरण करण्यात आले आहे. ईसीबी आणि बीसीसीआय यांनी या कसोटी मालिकेचे ‘अॅण्डरसन-तेंडुलकर ट्रॉफी’ असे नामकरण करण्यात आल्याची घोषणा केली. पतौडी परिवाराच्या गौरवासाठी ही मालिका जिंकणाऱ्या संघाच्या कर्णधाराला पतौडी पदक देऊन सन्मानित करण्यात येईल.
बुमराला आम्ही घाबरत नाही – बेन स्टोक्स
जसप्रीत बुमरा हा एक प्रतिभावान गोलंदाज आहे यात वादच नाही, मात्र आम्ही त्याला घाबरत नाही. केवळ एक गोलंदाज संघाला सामना जिंकून देऊ शकत नाही, अशा शब्दांत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने बुमराचे दडपण झुगारण्याचा माईंड गेम खेळलाय. बेन स्टोक्स म्हणाला, जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीचे कौशल्य आम्हाला माहिती आहे. तो प्रतिस्पर्धी संघापुढे नेहमीच आव्हान निर्माण करीत असतो, मात्र बुमराच्या गोलंदाजीचा आम्ही अभ्यास केलेला आहे. त्यामुळे आमचे फलंदाज त्याला घाबरणार नाही. केवळ एक गोलंदाज सामना जिंकून देऊ शकत नसतो.