पुणे : महापालिकेने कळस व बोपोडी येथे पालखीच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे. स्वच्छता, वैद्यकीय उपचार, विद्युत व्यवस्था, पाणी पुरवठा याकडे लक्ष दिले जाणार आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क आहे. तसेच सामाजिक संस्था, राजकीय पदाधिकारी, मंडळे, व्यापारी संघटनांनी स्वागताची जय्यत तयारी केली आहे.
आयुक्त नवलकिशोर राम हे दोन्ही पालख्यांचे स्वागत करणार आहेत. शहरातील पालखी मार्गावर विविध ठिकाणी स्वागत कमानी, निवाऱ्याची व्यवस्था, पत्र्याचे शेड, माहिती केंद्रे उभारण्यात आली आहेत. संगमवाडी पुलाजवळील सर्व कचरा हटविण्यात आला असून रस्तेही स्वच्छ करण्यात आले आहेत. पावसामुळे साचणारे पाणी दूर करण्यासाठी महापालिकेने पथके तैनात केली आहेत.
महापालिकेच्या घनकचरा विभागाने झाडूपासून ते कचरा विल्हेवाटीपर्यंत पूर्ण नियोजन केले आहे. दोन हजार तात्पुरती शौचालये बसवण्यात आली असून दिवसातून तीन वेळा स्वच्छतेचे नियोजन आहे. आरोग्य विभागाच्या वतीने फिरते दवाखाने, औषध फवारणी, मोफत तपासणी व उपचारांची सुविधा देण्यात आली आहे. महापालिकेच्या रुग्णालये, दवाखाने याही सेवा देणार आहेत.
वारकऱ्यांना आवाहनमहापालिकेने वारकऱ्यांना पाण्यासाठी अधिकृत व्यवस्था वापरण्याचे, स्वच्छता राखण्याचे आणि प्लास्टिक पिशव्या टाळण्याचे आवाहन केले आहे. उघड्यावरचे अन्न खाणे टाळण्याची सूचना असून कचरा कचरापेटीत किंवा स्वयंसेवकांकडे देण्याची विनंती करण्यात आली आहे.
अन्य विभागांची तयारीपथ विभाग : सोलापूर आणि सासवड रोडवरील रेलिंग्जची सफाई, पॅचवर्क आणि पाणी वाहून जाण्यासाठी उपाययोजना
अग्निशमन : सर्व अधिकारी, कर्मचारी रजा रद्द, वाकडेवाडी व फुलेनगर येथे अग्निशमन वाहने तैनात
विद्युत विभाग : मंदिर, मंडप, निवास शाळांमध्ये प्रकाश व ध्वनी यंत्रणा, अनेक ठिकाणी सीसीटीव्ही व्यवस्था
अतिक्रमण विभाग : पालखी मार्गावरील सर्व अतिक्रमण हटविण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती
आपत्ती व्यवस्थापन : महापालिकेचा कक्ष २४ तास सुरू असणार