Sindhudurg Rain Alert : समुद्र खवळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला, यलो अलर्टचा इशारा
esakal June 20, 2025 08:45 PM

IMD Alert Sindhudurg : गेल्या दोन-तीन दिवसांपासून कमी झालेल्या पावसाचा जोर आज पहाटेपासून काहीसा पुन्हा वाढला आहे. पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. समुद्र खवळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र, प्रत्यक्षात लाटांचा जोर फारसा नव्हता.

जिल्ह्यात १२ जून ते १६ दरम्यान मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्याच्या अनेक भागांत पूरसदृश ती निर्माण झाली. १६ तारखेच्या दुपारनंतर पावसाचा जोर कमी होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर गेले दोन-तीन दिवस पावसाच्या हलक्या सरी सुरू होत्या. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी, तर काही वेळ ऊन असे चित्र जिल्ह्यात होते; परंतु आज पहाटेपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. पावसाच्या जोरदार सरी पहाटेपासून जिल्ह्याच्या बहुतांशी भागात सुरू आहेत. वैभववाडी, कणकवली तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता.

Sindhudurg Flood Alert : सिंधुदुर्गात पूरस्थिती, तळेरे-कोल्हापूर महामार्ग ठप्प; हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट

जिल्ह्यात २० पासून यलो अलर्टचा इशारा

जिल्ह्यात आज पावसचा जोर वाढला आहे. दरम्यान, हवामान विभागाने २० ते २३ या कालावधीकरिता येलो अलर्ट दिला आहे. या कालावधीत काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

समुद्र खवळल्याचे चित्र नाही : मच्छीमार

पावसाळ्याच्या कालावधीत समुद्रात जशा लाटा उसळतात, तशा लाटा चार-पाच दिवसांपूर्वी किनारपट्टी भागात ऐकायला येत होत्या. मात्र, त्यानंतर म्हणावा तसा पाऊस न झाल्याने तसेच वातावरण निवळल्याने गेले दोन दिवस हे प्रमाण किरकोळ आहे. पावसाळ्यात जशा लाटा उसळतात, समुद्रामध्ये काडाकाड म्हणजेच मोठ्या प्रमाणात समुद्र खवळल्याचे चित्र असते, अशी परिस्थिती सध्या तरी किनारपट्टी भागात नाही. केवळ भरतीच्या लाटा उसळत आहेत, असे स्थानिक मच्छीमारांनी स्पष्ट केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.