Video: धक्कादायक व्हिडीओ! खड्डा खोदताना मलबा कोसळला, कामगाराचा जीव गेला; 'जेसीबी'चेही प्रयत्न निष्फळ
esakal June 20, 2025 03:45 AM

Chhatrapati Sambhaji Nagar News: शहरातील काबरानगर परिसरात ड्रेनेज लाईनसाठी खड्डा खोदत असताना, अचानक बाजूचा मलबा अंगावर कोसळून एका कामगाराचा जागीच दबून मृत्यू झाला. ही घटना १७ जून रोजी दुपारी घडली. मुकुंद दगडू साळवे (वय अंदाजे ४०-४५) असे मृत कामगाराचे नाव आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आला असून, अपघाताची भीषणता त्यात स्पष्ट दिसत आहे.

मुकुंद साळवे हे एका कंत्राटदारामार्फत महानगरपालिकेच्या ड्रेनेज खोदकामाचे काम करत होते. काबरानगर, जवाहरनगर परिसरात ड्रेनेज लाईन खोदण्याचे काम सुरू असताना, ही दुर्दैवी घटना घडली. खोदकाम सुरू असताना, बाजूच्या मातीवर ठेवलेली विटा, पाण्याने भरलेली टाकी आणि इतर मलबा अचानक खाली ढासळला. या ढिगाऱ्याखाली लोखंडी गज आणि लाकडी साहित्यासह संपूर्ण मलबा मुकुंद साळवे यांच्या अंगावर पडला.

अंगावर मलबा पडल्यानंतर साळवे यांना बाहेर काढण्यासाठी त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ प्रयत्न केले. मात्र, ढिगाऱ्यात लाकडी साहित्य अडकल्याने त्यांना बाहेर काढण्यात वेळ लागला. जेसीबीनेही मलबा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तो यशस्वी ठरला नाही. अखेर त्यांना बाहेर काढून त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने गजानन मंदिर परिसरातील एका खासगी रुग्णालयात नेले. परंतु, तेथील डॉक्टरांनी दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना घाटी रुग्णालयात हलवण्यात आले, पण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मुकुंद साळवे यांचा मृत्यू झाला होता.

या घटनेमुळे कामाच्या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने कामाच्या ठिकाणी योग्य सुरक्षा उपाययोजना करणे किती महत्त्वाचे आहे, हे या दुर्घटनेने अधोरेखित केले आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.