सविंदद्यात ओढ्यावरील पूल गेला वाहून
esakal June 20, 2025 03:45 AM

कवठे येमाई, ता.१९ : सविंदणे (ता. शिरूर) येथील कामठेवाडी ओढ्यावर सिमेंट पाइप टाकून तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेला पूल मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्यात पूर्णतः वाहून गेला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक, शालेय विद्यार्थी आणि शेतकरी यांना जीव मुठीत धरून ओढा पार करावा लागत असून, दैनंदिन प्रवासात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
पूल वाहून गेल्याने शेतमाल वाहतूक, जनावरांचा चारा ने-आण करणे, तसेच विद्यार्थ्यांचा शाळेत येण्या-जाण्याचा मार्ग अत्यंत धोकादायक झाला आहे. पावसाळ्यात ओढ्यातील पाणी वाढले की परिसराचा संपर्क पूर्णतः तुटतो आणि ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे कामठेवाडी येथील ओढ्यावर कायमस्वरूपी भक्कम पुलाचे बांधकाम तातडीने करावे, अशी मागणी माजी उपसरपंच नंदा पुंडे, माजी सैनिक दत्तात्रेय पडवळ, किसन कामठे, संतोष दाभाडे, माऊली पुंडे, गेणभाऊ राजगुडे, लहू कामठे, विठ्ठल कामठे, रामभाऊ कामठे आदी ग्रामस्थांनी केली आहे.

पावसाळ्यात दरवर्षी पूर आल्यानंतर पूल वाहून जातो. त्यानंतर तात्पुरते उपाय केले जातात. परंतु कायमस्वरूपी उपाययोजना होत नाहीत. प्रशासनाने नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन भक्कम पूल बांधावा.
- नंदा पुंडे, माजी उपसरपंच सविंदणे
01260

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.