तात्या लांडगे
सोलापूर : स्मार्ट सिटीतून सोलापूर शहरातील मुख्य चौकांमध्ये ३३० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याची स्वतंत्र कंट्रोल रूम महापालिकेत आहे. त्याठिकाणी दोन वाहतूक पोलिस बसलेले असतात. शहरातील रस्त्यांवरून वाहन घेऊन ये-जा करणाऱ्या १९ हजार ८७६ वाहनचालकांनी मागील साडेपाच महिन्यांत वाहतूक नियम मोडल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. त्या सर्वांना एकूण तीन कोटी ३१ लाख ९५ हजार ८५० रुपयांचा दंड केला आहे.
सोलापूर शहरातील रस्त्यावरून ये-जा करताना अनेक वाहनचालक वाहतूक नियम पाळताना दिसत नाहीत. अनेक दुचाकीस्वार मोबाईलवर बोलत वाहन चालवतात, अनेकजण विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येतात, दुचाकीस्वार ट्रिपल सीट असतात, रिक्षा चालक समोरील सीटवर प्रवासी बसवतात, ड्रेसकोडचे पालन करीत नाहीत, अशी स्थिती आहे. त्या वाहनांचे नंबर त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून शोधले जातात आणि त्या वाहन मालकास मोबाईलवर ऑनलाइन दंड पाठविला जातो. सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, सात रस्ता, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, हरिभाई देवकरण प्रशालेजवळ अशा महत्त्वाच्या बहुतेक चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
सिग्नल यंत्रणा नसलेल्या बहुतेक चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असून त्यात वाहतूक नियम मोडणारे वाहन चालक दिसतात. १ जानेवारी ते १५ जून या साडेपाच महिन्यात मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांना, ट्रिपल सीट दुचाकी चालविणाऱ्यांना, बेशिस्त रिक्षा चालकांना व विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या पोलिसांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
पाच महिन्यातील बेशिस्त वाहनचालक
मोबाईल टॉकिंग : ९,६६६
ट्रिपल सीट : ५,५९९
रिक्षात समोरील बाजूला प्रवासी : ३,१८६
विनागणवेश रिक्षा चालवणे : ९७७
विनाहेल्मेट पोलिस : ४४८
एकूण दंड : ३,३१,९५,८५० रुपये
प्रत्येक वाहनचालकांनी नियम पाळावा
सार्वजनिक रस्त्यावरून ये-जा करताना वाहतूक नियम पाळणे सर्वांसाठी बंधनकारक आहे. वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांबरोबरच शहरातील चौकाचौकांमधील ३३० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केली जात आहे. बेशिस्तांना स्वयंशिस्त लागावी आणि अपघात कमी व्हावेत, असा त्यामागील उद्देश आहे.
- सुधीर खिराडकर, सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक), सोलापूर शहर