इंग्लंड विरुद्ध भारत संघात कसोटी मालिकेला शुक्रवारपासून (२० जून) सुरूवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना लीड्समधील हेडिंग्ले येथे सुरू झाला असून पहिला दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवला. विशेषत: शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल या दोन खेळाडूंनी. भारताने पहिल्याच दिवशी साडेतीनशे धावांचा टप्पा पार केला आहे.
अनेक वर्षांनंतर विराट कोहली, रोहित शर्मा आणि आर अश्विन या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघ कसोटीत खेळत आहे. त्यामुळे युवा भारतीय संघ या सामन्यात कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.
ENG vs IND: अरर... ! साई सुदर्शन पदार्पणातच शुन्यावर बाद झाल्यानं नकोसे विक्रम नावावर! १५ वर्षांनंतरचा पहिलाच फलंदाज...या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकली आणि भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. भारताकडून केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल ही जोडी सलामीला फलंदाजीसाठी आले.
या दोघांनीही खराब चेंडूंचा चांगला समाचार घेत सलामीला ९१ धावांची भागीदारी केली. हेडिंग्लेमधील ही भारतीय सलामीवीरांनी केलेली सर्वोच्च भागीदारी आहे. तसेच २०१२ नंतर हेडिंग्लेत पहिल्या डावात अर्धशतकी भागीदारी करणारी ही पहिली सलामी जोडी ठरली.
दरम्यान, २५ व्या षटकात ही जोडी ब्रायडन कार्सने तोडली. त्याने केएल राहुलला जो रुटच्या हातून ७८ चेंडूत ४२ धावांवर झेलबाद केले. त्याच्या पुढच्याच षटकात स्टोक्सने साई सुदर्शनला शुन्यावरच बाद केले. पण त्यानंतर शुभमन गिलने यशस्वी जैस्वालची दमदार साथ दिली. त्यांच्यात १२९ धावांची भागदारी झाली.
या भागीदारी दरम्यान यशस्वी जैस्वालने शतक पूर्ण केले. त्याचे हे पाचवे शतक आहे. त्याला बेन स्टोक्सने ५३ व्या षटकात त्रिफळाचीत केले. जैस्वालने १५९ चेंडूत १६ चौकार आणि १ षटकारासह १०१ धावांची खेळी केली.
Shubman Gill Century: कर्णधारपदाचा शुभ आरंभ! गिलचं हेडिंग्लेत खणखणीत शतक; विराट-गावसकरांच्या पंक्तीत स्थानतो बाद झाल्यानंतरही गिलचीसाथ उपकर्णधार रिषभ पंतने दिली. त्यांनी नंतर दिवस संपेपर्यंत इंग्लंडला विकेट मिळू दिली नाही. त्यांच्या दिवस अखेरपर्यंत १३८ धावांची नाबाद भागीदारी झाली. यादरम्यान, गिलने त्याचे सहावे कसोटी शतक पूर्ण केले. कर्णधार म्हणून हे त्याचे पहिलेच शतक ठरले. तसेच रिषभ पंतनेही आक्रमक खेळताना अर्धशतक ठोकले.
पहिला दिवस संपला तेव्हा भारताच्या पहिल्या डावात ८५ षटकात ३ बाद ३५९ धावा झाल्या. शुभमन गिल १७५ चेंडूत १६ चौकार आणि १ षटकारासह १२७ धावांवर नाबाद आहे. रिषभ पंत १०२ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ६५ धावांवर नाबाद आहे.
इंग्लंडकडून बेन स्टोक्सने २ विकेट्स घेतल्या. ब्रायडन कार्सने १ विकेट घेतली.