Sharad Pawar : महापालिका निवडणुका एकत्रित लढण्याची इच्छा; ठाकरेंबरोबर करणार चर्चा
esakal June 21, 2025 06:45 AM

बारामती - मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

याबाबत उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांबरोबर एकत्र चर्चा करून निर्णय घेऊ, असेही पवार यांनी स्पष्ट केले. तसेच, मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची ताकद अधिक असल्याचेही ते म्हणाले.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ‘मराठी’चा मुद्दा गाजत असून मराठी माणसासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकत्र यावे, यासाठी या पक्षांचे नेते प्रयत्न करत आहेत.

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या इतर काही नेत्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असला तरी राज यांनी अद्याप उत्तर दिले नाही. यापार्श्वभूमीवर पत्रकारांनी शरद पवार यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढण्याची इच्छा असल्याचे सांगितले.

याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसून इतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांबरोबर चर्चा केल्यानंतर धोरण ठरविले जाईल, असे ते म्हणाले. मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची ताकद अधिक असल्याचे सांगताना पवार यांनी, उद्धव यांची भेट घेणार असल्याचेही सांगितले.

त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र येणार की विधानसभा निवडणुकीप्रमाणेच महाविकास आघाडीचे पक्ष एकत्रित निवडणूक लढविणार, याबाबत राजकीय कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.