मन करा रे प्रसन्न
esakal June 21, 2025 11:45 AM

- शलाका तांबे, लेखिका, लाइफ कोच, समुपदेशक

आज जागतिक योग दिवस. योग म्हणजे केवळ शारीरिक स्वास्थ्यासाठी करण्याची आसने नव्हेत, तर योग म्हणजे आपल्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य आणि उन्नतीसाठी असलेला एक सुवर्णमार्ग. योग म्हणजे एक जीवनशैली ज्यामध्ये आपण आपल्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी सतत कार्यशील असतो. म्हणूनच शारीरिक स्वास्थ्याबरोबर मानसिक स्वाथ्यालाही तेवढेच महत्त्व आहे.

शरीर आणि आत्मा यांच्यातील दुवा किंवा यांना जोडणारा धागा म्हणजे आपले मन. आपले मन आपल्या सगळ्या भौतिक आणि आंतरिक अनुभवांना अर्थ देते. म्हणूनच मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवणे फार महत्त्वाचे आहे.

मन केव्हा खऱ्या अर्थाने स्वस्थ असते? तर ते प्रसन्न असते तेव्हा! ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण’, हा मौल्यवान उपदेश संत तुकाराम महाराजांनी आपल्याला केलेला आहे. आपल्या मनाचे स्थायीभाव कोणते असतील, तर ते म्हणजे स्थिरता आणि प्रसन्नता.

स्थिर मन आपल्याला आयुष्यात कोणत्याही गोष्टींना, परिस्थितींना शांतपणे आणि खंबीरपणे सामोरे जायला ताकद देते आणि प्रसन्न मन आपल्याला एक निरोगी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी प्रेरित करते. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी एक ऊर्जा प्रदान करते. मग आज जागतिक योगदिनाच्या निमित्ताने हे बघूयात, की दैनंदिन आयुष्यात आपल्या मनाचा स्थिर आणि प्रसन्न भाव कसा जोपासावा?

स्थिर मन म्हणजे शांत मन. रोजच्या धकाधकीमध्ये आपल्या मनाला अशांत करणाऱ्या गोष्टींपासून मनाला थोडा ब्रेक देणे खूप गरजेचे असते. आपली कामे, आपल्या जबाबदाऱ्या, आपली टू-डू-लिस्ट कधी संपत नसते. त्यामुळे मनसुद्धा सतत कुठल्या न कुठल्या विचारांमध्ये गुंतलेले असते. आपल्या मनालाही थोडी नियमित विश्रांती आवश्यक असते आणि यासाठी अगदी सहज करण्यासारखी गोष्ट म्हणजे mindful breathing.

रोज किमान तीनदा, म्हणजे सकाळी दिवस सुरू करताना, दुपारी एकदा आणि संध्याकाळी जेवणाच्या आधी तीन मिनिटांचे mindful breathing करावे. तीन मिनिटे दीर्घ श्वास घेत तुमच्या विचारांना आणि मनाला स्थिर करावे. स्थिर आणि शांत मन आपली एकाग्रता वाढवते आणि एकाग्र चित्ताने केलेली कोणतीही गोष्ट सफल होतेच.

मन म्हणजे जगाकडे पाहण्याचा आपला चष्मा आहे. तो चष्मा जर चिंता आणि नकारात्मकतेने धूसर झाला असेल, तर जीवनातल्या चांगल्या गोष्टींकडेही आपले लक्ष कमी जाते; पण मन प्रसन्न आणि आनंदी असेल, तर छोट्या गोष्टींमध्येही समाधान सापडते.

प्रसन्नता, आनंद आणि समाधान हे तिन्ही मनाचे आवडते आणि मूलभूत भाव आहेत. हे भाव अनुभवण्यासाठी आपले मन कायम आतूर असते.

आपल्या मनाला ज्या गोष्टींनी आनंद मिळतो, अशी एक तरी गोष्ट तुमच्या रोजच्या रुटीनचा भाग असावी. मन प्रसन्न राहील असे वातावरण आपण आपल्या घरात निर्माण केले पाहिजे. आपले घर, आपल्या कामाची जागा स्वच्छ व सुंदर ठेवणे.

आपल्या पाचही इंद्रियांना प्रसन्न वाटेल अशी एनर्जी घरात निर्माण करून एक प्रसन्न वातावरण कायम घरात ठेवणे. या गोष्टी छोट्या वाटू शकतील; पण त्यांचा खूप सुंदर प्रभाव आपल्या मनावर होत असतो हे खरे.

असमाधानी मन कायम अस्थिर असते आणि हे आपल्या मनाच्या स्थायीभावाच्या विरुद्ध आहे. म्हणून समाधानी भावना ही आपण सर्वांनीच मनात कायम जोपासणे आवश्यक असते. किमान आठवड्यातून एकदा तरी अशा तीन गोष्टींची किंवा अनुभवांची नोंद करा- ज्यांनी तुम्हाला समाधान वाटेल.

कृतज्ञतेचा अनुभव मनाला सर्वाधिक समाधान देऊन जातो. त्यामुळे अशा गोष्टींची जाणीवपूर्वक मानसिक नोंद घेणं आणि त्याची नियमित आठवण ठेवणं, ही खूप आवश्यक सवय आहे- जी आपले मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यास फार उपयोगी ठरू शकते.

शांत, स्थिर, प्रसन्न, आनंदी आणि समाधानी मन हे आपल्या निरोगी आणि सुखी जीवनाचा आधार आहे आणि म्हणून मग आज या जागतिक योगदिनाच्या निमित्ताने ‘मानसभान’ ठेवून आपण असा संकल्प घेऊयात, की ‘मी माझ्या मनाच्या स्वास्थ्यासाठी, आनंदासाठी आणि प्रसन्नतेसाठी काही चांगल्या सवयी स्वतःला नक्की लावीन.’

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.