टीम इंडियाने इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या कसोटीतील दुसऱ्या दिवशीही आपला दबदबा कायम ठेवत जबरदस्त सुरुवात केलीय. टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिल आणि उपकर्णधार ऋषभ पंत या जोडीने अप्रतिम सुरुवात केली. यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल या जोडीने पहिल्या दिवशी शतक केलं. त्यानंतर आता पंतने दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात खणखणीत षटकारासह चाबूक शतक पूर्ण केलं. टीम इंडियाने यासह शतकाची हॅटट्रिक पूर्ण केली. तसेच पंतने या शतकासह ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
शुबमन आणि पंतने दुसऱ्या दिवशी 85 षटकांनंतर 3 बाद 359 धावांपासून खेळाला सुरुवात केली. या जोडीने आक्रमक सुरुवात करत फटकेबाजी केली. पंतने या दरम्यान 1-2 धावांसह काही मोठे फटके मारले आणि शतकाच्या जवळ येऊन पोहचला. पंतला शतकासाठी फक्त 1 धाव हवी होती. तेव्हा पंतने 100 व्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर कडक सिक्स ठोकून शतक पूर्ण केलं. पंतने 146 बॉलमध्ये 71.92 च्या स्ट्राईक रेटने हे शतक पूर्ण केलं. पंतच्या या खेळीत 10 चौकार आणि 4 षटकार लगावले. पंतच्या कसोटी कारकीर्दीतील हे सातवं तर इंग्लंडमधील तिसरं शतक ठरलं. पंतने लीड्सआधी इंग्लंडमध्ये ओव्हल आणि बर्मिंघममध्ये शतक केलं होतं.
पंतने यासह आजी माजी कर्णधारांचा रेकॉर्ड ब्रेक केला. पंतने शुबमन गिल आणि महेंद्रसिंह धोनी या दोघांना मागे टाकलं. पंतने कसोटी शतकांबाबत धोनी आणि गिल यांना मागे टाकलं. गिल आणि धोनी या दोघांच्या नावावर कसोटीत प्रत्येकी 6-6 शतकांची नोंद आहे.
दरम्यान पंतने शतकासह इतिहास घडवला. पंत कसोटीत टीम इंडियासाठी सर्वाधिक शतकं करणारा पहिला विकेटकीपर ठरला. पंतने याबाबतीत धोनीचा रेकॉर्ड ब्रेक केला.पंतने सर्वात वेगवान 76 डावात सातवं शतक केलं. तर धोनीने 144 डावात 6 शतकं केली होती.