7 वर्षात मी एकदाही सुट्टी घेतली नाही, बायकोलाही सांगितलं; शरद पवारांसमोर जयंत पाटील भावूक
Marathi July 15, 2025 08:25 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant patil) यांनी अखेर आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा (राजीनामा) दिला. त्यानंतर, पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पक्षाच्या नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा केली. तत्पूर्वी, जयंत पाटील यांनी त्यांच्या 7 वर्षातील कार्यकाळावर प्रकाश टाकला. गेल्या 7 वर्षात त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळात झालेल्या पक्षातील घडामोडी आणि घटनांची माहिती दिली. मी 2633 दिवस पक्षाचा अध्यक्ष आहे. 7 वर्षे एकही सुट्टी न घेता आपण पक्षासाठी (NCP) काम केल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं. तसेच, बायकोलाही मी हे सांगितलं, असं म्हणताना जयंत पाटील भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

जयंत पाटलांनी भाषणाची सुरुवात करतानाच, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज यादीत घालण्यात आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच, साताऱ्यातील पुसेसावळी येथे धर्मावरून दंगल घडली. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं, त्यावर आता कुठेतरी उत्तरेतील प्रभाव दिसू लागला आहे. उत्तरेतील काही राज्यातील लोकांना खुश करण्यासाठी हिंदी सक्तीचे प्रयत्न झाले. मुंबई महापालिका निवडणुकात एका विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला, असे म्हणत जयंत पाटलांनी सरकावर हल्लाबोल केला. शेतकरी रोज विविध संकटाना तोंड देत आहे, शेतकऱ्याने बैल नाही म्हणून नांगरला जुंपून शेती करत असल्याचं चित्र महाराष्ट्राने पहिल, असं कधी आधी झालं नव्हतं. सातबारा कोरा करू, अशी आश्वासने महाराष्ट्रातील जनतेने ऐकली आहेत. विधानसभेला आपण खूप ताकद लावली परंतु यश मिळाल नाही. आता बिहारमध्ये सगळी मतदारयादी नव्याने करत आहेत. 35 लाख मतदार यांनी बाद केले, असं प्रत्येक राज्यात केल जाईल. आता हे विविध राज्यात होईल, असा संभाव्य धोकाही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

आपल्या पक्षाची दुसऱ्या पक्षासारखी परिस्थिती नव्हती, तरीदेखील दोन अमोल माझ्यासोबत होते. एक अमोल कोल्हे आणि एक अमोल मिटकरी, सध्या मिटकरी तिकडे गेले. त्यावेळी आपण 54 जागा जिंकल्या, 17 टक्के मतदान आपल्याला मिळालं. त्यावेळी सत्ता आली आणि कोव्हिड आला. राजेश टोपे यांचं काम कुणीही विसरणार नाही. पण, मतदारसंघांतील लोक कसे विसरले माहिती नाही, असे म्हणत टोपे यांच्या पराभवाबद्दल खेद व्यक्त केला. सामान्य माणसाचा थेट संपर्क शरद पवारांसोबत झाला. त्यावेळी परिवार संवाद यात्रा काढण्यात अली होती. 7 हजार 600 किमी आम्ही प्रवास त्यावेळी आम्ही केला होता. जिथ आम्ही निवडणुका लढत नव्हतो, तिथ देखील आम्ही पोहोचलो. शरद पवार यांच नाव घेतलं की महाराष्ट्रात कोणत्याही गावात 50 कार्यकर्ते सहज मिळतात, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

पक्षफुटीनंतर 8 खासदार निवडून आले

मधल्या काळात पक्ष फुटला, आम्ही त्यावेळी पॅनिक न होता जागेवर राहण्याचा निर्णय घेतला आणि अपात्रतेची कारवाई करण्याबाबत आम्ही त्याचरात्री विधानसभा अध्यक्षांकडे प्रस्ताव दिला. लोकसभेला आपल्याला प्रचंड यश मिळाल. इथ बसलेले 8 खासदार हे शरद पवार यांच्या कष्टाचे फळ आहे. शरद पवार यांनी प्रचंड काम केलं. निवडणूक आयोगाकडून उलटा निकाल, त्यामुळे महाराष्ट्रातील जनता प्रचंड नाराज झाली. जनतेने आपल्याला साथ दिली. आपण लोकसभेला 10 जागा लढवल्या आणि प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे निवडणुकीत 8 खासदार आपले निवडून आल्याची आठवण जयंत पाटील यांनी सांगितली.

मी कधीच वेगळा गट केला नाही

आम्ही विधानसभा निवडणुकीत पुन्हा यात्रा काढली, प्रचंड प्रवास झाला. शेवटची सभा माझ्या मतदारसंघात होती. त्यावेळी प्रचंड पाऊस पडला, सगळे लोक निघून गेले. माझीच अब्रू जातेय की काय अशी परिस्थितीत होती. परंतु, पाऊस संपल्यानंतर मोठ्या संख्येने लोक सभेला आले. पक्षाचा अध्यक्ष या नात्याने प्रत्येक मतदारसंघात जाण्याचा मी प्रयत्न केला. माझी कोणतीही संघटना नाही, मी वेगळा गट केला नाही. वेगळं फाउंडेशन काढलं नाही, असलं पाप कधीही केलं नाही. साहेब जो निर्णय देतील तो आम्ही स्वीकारला, आम्ही 25 वर्षे या पक्षात आहोत. साहेबांनी निर्णय घेतलेला असतो, त्यावेळी बराच विचार करून निर्णय घेतला असतो. 2,633 दिवस मी पक्षाचा अध्यक्ष आहे. मला अध्यक्षपदाची संधी साहेबांनी दोनदा दिली. आमची बेळगावला सभा होती, त्यावेळी शरद पवारांनी माझ्यावर जबाबदारी दिली. इतके दिवस मी पक्षाचा अध्यक्ष आहे, आता ही योग्य वेळ आहे की मी आता या पदावरून बाजूला व्हावं. मी साहेबांना विनंती करतो, त्यांनी नवीन अध्यक्ष निवडावा, असे म्हणत जयंत पाटील यांनी आपण पायउतार होणार असल्याचे स्पष्ट केले.

जयंत पाटील भावूक

माझे सगळे सहकारी गेले तरी मी साहेबांसोबत एकनिष्ठ रहाण्याचा निर्णय घेतला, 7 वर्षात मी एकदाही सुट्टी घेतली नाही, बायकोलाही ते सांगितलं, असे म्हणताना जयंत पाटील भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच, दोन खासदार असलेला भाजप मोठा होऊ शकतो तर 10 आमदार असलेला आपला पक्ष मोठा का होऊ शकत नाही, असे म्हणत जयंत पाटील यांनी नव्या अध्यक्षांच्या निवडीचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर, शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केली.

हेही वाचा

जगप्रसिद्ध टेस्ला कारचं देशातील पहिलं शोरुम मुंबई, ठळक अक्षरात ‘मराठी नामफलक’

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.