पुणे - सिंहगड रस्त्यावरील तिसऱ्या टप्प्यातील उड्डाणपूल १५ जून रोजी वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर केले होते. पण मे व जून महिन्यात झालेल्या जोरदार पावसानंतर या कामाचे नियोजन बिघडले आहे. त्यामुळे माणिकबाग ते हिंगणे या दरम्यानचा उड्डाणपूल सुरु होण्यास अजून किमान एक महिना लागण्याची शक्यता आहे.
सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ११८ कोटी रुपये खर्च करून उड्डाणपूल बांधण्याचे काम सप्टेंबर २०२२ मध्ये झाले. यामध्ये राजाराम पूल चौक, विठ्ठलवाडी कमान ते फनटाइम थिएटर या दोन टप्प्यातील उड्डाणपुलांचे काम पूर्ण झाले. या दोन्ही पुलांचे लोकार्पण अनुक्रमे २६ जानेवारी २०२५ आणि १ मे २०२५ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले आहे.
तिसऱ्या टप्प्यातील माणिकबाग ते हिंगणे या दरम्यानच्या सुमारे दीड किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे उद्घाटन १५ जून रोजी होणार असल्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर केले होते. त्याचे कामही वेगात सुरु होते. पण मे महिन्यापासून सतत मोठा पाऊस पडत आहे. त्यामुळे उड्डाणपुलाचे रॅम्प तयार करण्याचे काम काही दिवस थांबले होते.
या रॅम्पवरील मुरूमाचे चिखलात रूपांतर झाले, त्यामुळे पुढचे काम करण्यासाठी मुरूम सुकण्याची वाट पहावी लागली. तसेच उड्डाणपुलावरील डांबरीकरण पावसामुळे करत आलेले नाही. जून महिन्यातही चांगला पाऊस झाला. त्यामुळे कामाची गती संथ झाली आहे. हे काम जुलै महिन्याच्या अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे.
प्रकल्प विभागाचे प्रमुख, मुख्य अभियंता युवराज देशमुख म्हणाले, माणिकबाग ते हिंगणे उड्डाणपुलाचा रॅम्प तयार करताना मुरूम टाकल्यानंतर पावसामुळे तेथे चिखल झाला. त्यानंतर डांबरीकरण आणि अन्य कामे करण्यात अडथळे निर्माण झाले. हे काम पूर्ण होण्यास आणखी काही दिवसांचा कालावधी लागणार आहे.
बॉटेलनेकचे काय करणार?
हिंगण्यामध्ये ज्या ठिकाणी उड्डाणपूल उतरतो तेथे सेवा रस्ता अरुंद आहे. त्याठिकाणी रस्त्याच्या कडेला झाड आहे. तसेच पेट्रोल पंपावरील सीएनजी भरणाऱ्या वाहनांची रांग रस्त्यावर आल्याने या ठिकाणी कोंडी होत आहे. अनेकदा पेट्रोलपंपापासून मागे संतोष हॉलपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत.
उड्डाणपूल सुरु झाल्यानंतरही ही कोंडी कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच उड्डाणपुलावरून येणारी वाहने डावीकडे वळून पेट्रोल पंपावर जाण्याचा प्रयत्न केल्यास अपघात होण्याची शक्यता आहे तसेच कोंडीही वाढणार आहे. त्यामुळे या ठिकाणचा बॉटलनेक महापालिका प्रशासन, वाहतूक पोलिस कसा संपविणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.