Leopard Sighting : सिंहगड जवळील कल्याण गावात मंदिराच्या परिसरात बिबट्याचे दर्शन
esakal June 22, 2025 03:45 PM

खडकवासला : सिंहगडाच्या दक्षिणेला असलेल्या ऐतिहासिक कल्याण गावात शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास श्री करंजाई मातेच्या मंदिराच्या अंगणात बिबट्याचे दर्शन झाले. मंदिरात उपस्थित तरुणांना अचानक हालचाल जाणवल्याने त्यांनी लगेचच मोबाईलद्वारे चित्रीकरण केले. या चित्रीकरणात बिबट्या मंदिराच्या अंगणाच्या भिंतीलगत दिसून आला. हालचाल जाणवल्याने तो लगेचच भिंतीवर चढून जंगलाच्या दिशेने पळून गेला.

मागील आठवड्यात जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे सिंहगडावरून घाट रस्त्याने उतरत असताना मोरदरी खिंडीजवळ रस्त्यावरच त्यांना बिबट्याचे दर्शन झाले होते. या भागासह सिंहगडाच्या परिसरातील गावांत सध्या सातत्याने बिबट्याचा वावर दिसून येत आहे.

साधारणपणे उन्हाळ्यात जंगलात पाणी व भक्ष्याचा तुटवडा जाणवू लागल्याने बिबट्याचा वावर मानवी वस्त्यांकडे वाढतो, असे अनेकदा दिसून आले आहे. मात्र सध्या पावसाळ्यातच या भागात बिबट्याचे दर्शन होत असल्याने स्थानिक नागरिकांत घबराट आहे. याबाबत, वन विभागाने लक्ष घालून योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गावकऱ्यांतून केली जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.