Mumbai News – मुंबई विमानतळावर 16 कोटी रुपयांचे ड्रग्ज आणि सोने जप्त; सीमाशुल्क विभागाची कारवाई
Marathi June 23, 2025 01:25 AM

मुंबई विमानतळार सलग दोन दिवस केलेल्या कारवाईत 16 कोटी रुपयांचे ड्रग्ज आणि सोने जप्त करण्यात आले आहे. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. या कारवाईत एकूण चार जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

पहिली कारवाई गुप्त माहितीच्या आधारे शनिवारी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई कस्टम झोन III च्या अधिकाऱ्यांनी बँकॉकहून येणाऱ्या दोन भारतीय नागरिकांना अटक केली. त्यांच्या सामानाच्या तपासणीत अनेक व्हॅक्यूम-सील केलेले गांजाचे पॅकेट जप्त करण्यात आले. या गांजाचे एकूण निव्वळ वजन 11.881 किलोग्रॅम होते, ज्याची बाजारातील किंमत 11.88 कोटी रुपये आहे. ट्रॉली बॅगमध्ये ठेवलेल्या उशीच्या कव्हरमध्ये गांजा लपवण्यात आला होता.

दुसरी कारवाई रविवारी करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे एअर इंटेलिजेंस युनिटच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर काम करणाऱ्या दोन व्यक्तींवर पाळत ठेवून अटक केली. दोघांची झडती घेतली असता त्यांच्या खिशात ठेवलेल्या मोज्यांमध्ये 4.44 किलो 24 कॅरेट सोने लपवून ठेवल्याचे आढळले. जप्त केलेल्या सोन्याची बाजारातील किंमत 4.24 कोटी रुपये आहे. दोन्ही कर्मचाऱ्यांना कस्टम्स कायदा, 1962 च्या संबंधित तरतुदींनुसार अटक करण्यात आली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.