'एसटी'ची श्वेतपत्रिका आज होणार जाहीर
esakal June 23, 2025 11:45 AM

‘एसटी’ची श्वेतपत्रिका आज होणार जाहीर

मुंबई, ता. २२ : एसटी महामंडळाला सुमारे १० हजार कोटी संचित तोटा आहे. त्याचवेळी सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कमेपैकी एक हजार कोटी रुपये इतकी रक्कम राज्य सरकारने दिली नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत नाही. एसटी कर्मचाऱ्यांना वेतन वेळेत मिळण्यासाठी व इतर आर्थिक कामकाजासंदर्भातील एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका सोमवारी (ता.२३) जाहीर करण्यात येणार आहे.
एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी, तसेच भविष्यातील नियोजनासाठी आर्थिक श्वेतपत्रिका तयार करावी, असे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला एप्रिलमध्ये दिले होते. त्यानंतर दोन महिन्यांनी श्वेतपत्रिका जाहीर केली जाणार आहे.
एसटी महामंडळाचा सुमारे १० हजार कोटी संचित तोटा असल्याने महामंडळाला कर्मचाऱ्यांचे वेतन, वाहन खरेदी, टायर खरेदी, इंधन खरेदी, स्थानकांचे नूतनीकरण व इतर आस्थापना खर्चासाठी दररोज आर्थिक कसरत करावी लागते. कर्मचाऱ्यांची देणी, भविष्य निर्वाह निधीचे हप्ते, कामगार करारातील प्रलंबित देणी यासाठी महामंडळाला पैशाची गरज आहे. त्याचबरोबर महामंडळाला इंधन, वस्तु व सेवा पुरविणाऱ्या संस्थांची थकीत देणीही द्यायची आहेत. या सर्व घटकांचा विचार करून एसटी महामंडळाला सध्या किती उत्पन्न मिळते, किती खर्च येतो, तसेच किती देणी बाकी आहे, या सर्वांचा लेखा-जोखा मांडणारी ही श्वेतपत्रिका जाहीर केली जाणार आहे.

कर्मचारी संघटनेकडून स्वागत
महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले की, ‘एसटी कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या प्रत्येक निर्णयाचे स्वागत आहे. त्यामुळे परिवहनमंत्र्यांचा निर्णय योग्य आहे. परंतु, हा निर्णय तात्पुरता नसावा, कायमस्वरूपी असायला हवा, एसटी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह व उपदान रक्कम वेतनातून कपात केली आहे. पण निधी अभावी त्या संबंधित संस्थेकडे जमा करण्यात आलेल्या नाहीत.’

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.