वृत्तसंस्था/ इंदोर
राजा रघुवंशीच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला आहे. या एका महिन्यात राजाच्या मृत्यूचे रहस्य पूर्णपणे सुटलेले नाही. पोलिसांना याप्रकरणी नवनवे सुगावे लागत आहेत. प्रॉपर्टी डीलर सिलोम जेम्सच्या अटकेनंतर आता याप्रकरणी एका गार्डचे नाव समोर येत आहे.राजा रघुवंशी हत्याप्रकरणी तपास करणाऱ्या एसआयटीने इंदोरमधील प्रॉपर्टी डीलर सिलोम जेम्सला ताब्यात घेतले आहे. सिलोमकडे राजा आणि सोनमची बॅग मिळाली. तर आता पोलिसांनी इमारतीच्या गार्डलाही ताब्यात घेतले आहे.
सोनमच्या फ्लॅटमध्ये दागिन्यांची बॅग
राजाच्या हत्येनंतर शिलाँग येथून परतलेली सोनम हीराबाद येथील एका फ्लॅटमध्ये वास्तव्यास होती. हा फ्लॅट सिलोम जेम्सच होता, जो राजाचा मित्र विशाल सिंह ठाकूरने मासिक भाड्याने घेतला होता. सोनम याची फ्लॅटमध्ये राहत होती. परंतु हत्या प्रकरणी आकाशला अटक झाल्याचे कळताच सोनम कारने गाझीपूर येथे फरार झाली होती आणि तिचे सामान फ्लॅटमध्येच राहिले होते.
सिलोमने गायब केली बॅग
9 जून रोजी सोनमने गाझीपूरमध्ये पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आणि दुसऱ्याच दिवशी सिलोम जेम्स हा फ्लॅटमध्ये पोहोचला होता. यादरम्यान सिलोमने सोनमचे सर्व कपडे, दागिने आणि पिस्तुलसमवेत अन्य सामग्री बॅगेत ठेवली होती. सोनमच्या अटकेनंतर पोलीस या बॅगेचा शोध घेत होते. ही बॅग आता सिलोमकडून हस्तगत झाली आहे.
सीसीटीव्ही फुटेजमुळे खुलासा
बॅगेच्या शोधात पोलिसांनी संबंधित इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सिलोम पार्किंगमध्ये दिसून आला आणि यानंतर तो सोनमच्या फ्लॅटमध्ये जात तेथून बॅग घेऊन बाहेर पडल्याचे स्पष्ट झाले. या बॅगेत सोनमची सामग्री असेल असा संशय पोलिसांना होता, जो खरा ठरला आहे.
गार्डवर बळावला संशय
एसआयटीने सिलोमला फोन करून चौकशीसाठी बोलाविले. तर त्याने भोपाळला जायचे असल्याचे सांगत फोन बंद करून ठेवला होता. पोलिसांनी नाकाबंदी करत सिलोमला पकडले. तर राजाच्या हत्याप्रकरणी खुलासा झाल्यापासून इमारतीचा गार्डही बेपत्ता होता. हीराबागच्या ज्या फ्लॅटमध्ये सोनम राहिली होती, त्याची चावी गार्डकडेच होती. गार्डकडून चावी मिळवत सिलोम फ्लॅटमध्ये दाखल झाला होता. आरोपींना पकडण्यात आल्यावर गार्ड फरार झाला, ज्याला पोलिसांनी अशोकनगर येथून अटक केली आहे.