Nashik Crime : नाशिक रोडवर दोन बंगल्यांत चोरट्यांचा धुमाकूळ; साडेनऊ लाखांचा ऐवज लंपास
esakal June 24, 2025 12:45 AM

नाशिक- नाशिक रोड-देवळाली कॅम्प रस्त्यावरील दोन बंगल्यांचे कडीकोयंडे तोडून चोरट्यांनी साडेनऊ लाखांचा ऐवज नेला. या प्रकरणी उपनगर पोलिसांत घरफोडीचा गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

रामेश्वर रामनाथ सिंह (वय ६०, रा. मॅगोट्री लॉन्सच्या पुढे, देवळाली कॅम्प, नाशिक रोड) यांच्या फिर्यादीनुसार, नाशिक रोड-देवळाली कॅम्प रस्त्यावरील मॅगोट्री लॉन्सच्या पुढे पॅराडाइज एन्क्लेव्ह फेज आहे. या ठिकाणी फेज टूमधील बंगला क्रमांक एक प्रदीपकुमार (वय ६२) यांचा असून, ते सध्या ऑस्ट्रेलियात गेलेले आहेत. फेज वनमधील बंगला क्रमांक एकमध्ये चैतन्य प्रकाश पायदीमुक्काला भाडेकरू राहतात. या दोन्ही बंगल्यांचा चोरट्यांनी शुक्रवारी (ता. २०) मध्यरात्री कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला.

घरफोडीमध्ये चोरट्यांनी प्रदीपकुमार यांच्या बंगल्यातून ४० हजारांच्या रोकडसह आठ लाख ५८ हजार ५०० रुपयांचा ऐवज, तर चैतन्य यांच्या बंगल्यातून ७८ हजारांचे चांदीची भांडी असा एकूण नऊ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा ऐवज नेला. हा प्रकार दुसऱ्या दिवशी निदर्शनास आला. प्रदीपकुमार फिर्यादी रामेश्वर सिंह यांचे मित्र असून, त्यांच्याच फिर्यादीनुसार उपनगर पोलिसांत घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Sangli Crime : शेत नावावर करण्यासाठी भावावर हल्ला; हातातील विळ्याने मानेवर वार

चोरीस गेलेला ऐवज

८० हजारांच्या सोन्याच्या दहा अंगठ्या, दोन लाख ४० हजारांची सोन्याची चेन, एक लाख २० हजारांच्या कानातील रिंगा, दोन लाख ४० हजारांच्या सोन्याच्या बांगड्या, आठ हजारांच्या रिंगा, २० हजारांच्या सोन्याच्या सिंदूर, ८० हजारांचे सोन्याचे १० क्वाइन, १५ हजारांचे चांदीचे १० क्वाइन, ५०० रुपयांची चांदीची पायल, १५ हजारांचा चांदीचा दिवा, ४० हजारांची रोकड, तर दुसऱ्या घरफोडीत १५ हजारांची चांदीची समई, १५ हजारांची चांदीची थाळी, १५ हजारांचे चांदीचे ग्लास, १५ हजारांची चांदीची वाटी आणि १८ हजारांची सहा स्मार्ट वॉच असा एकूण नऊ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीस गेला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.