इराण इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, इकडे गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले, काय घडलं?
Marathi June 24, 2025 02:25 AM

सामायिक बाजार अद्यतन मुंबई : इराण इस्त्रायल संघर्षात अमेरिकेनं उडी घेतल्यानंतर शेअर बाजारावर त्याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. कमजोर आंतरराष्ट्रीय संकेत आणि मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यानं भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं. सेन्सेक्स 900 अकांनी घसरून 81488 अंकांपर्यंत पोहोचला होता. तर, निफ्टी 50 निर्देशांक 24850 अंकांच्या खाली आला होता. बीएसई मिडकॅप, स्मॉल कॅप निर्देशांकात देखील जवळपास 1 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली.

गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य गेल्या सत्राच्या तुलनेत 448 लाख कोटींनी घटून 445 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आलं. म्हणजेच शेअर बाजारात सकाळचं सत्र सुरु झाल्यानंतर 3 लाख कोटींचं गुंतवणूकदारांचं नुकसान झालं.

शेअर बाजारातील घसरणीची प्रमुख कारणं :

इराण आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्षात अमेरिकेनं उडी घेतल्यानं शेअर बाजारावर त्याचा परिणाम दिसून आला. इराण आणि इस्त्रायल संघर्ष दीर्घकाळ चालणार नाही ही गुंतवणूकदारांची अपेक्षा फोल ठरली. अमेरिकेनं इराणच्या तीन आण्विक केंद्रांवर हल्ले केले. यामुळं मध्य पूर्वेतील संघर्षा वाढला आहे. जियोजित इन्वेस्टमेंटस लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार वी.के. विजयकुमार म्हणाले की,जरी इराणच्या आण्विक तळांवर अमेरिकेनं हल्ले केल्यानं पश्चिम आशियातील संकट वाढलं असलं तरी याचा शेअर मार्केटवरील परिणाम मर्यादित राहील, अशी शक्यता आहे. इराण या हल्ल्यांना कसा प्रतिसाद देतो यावर पुढच्या घडामोडी अवलंबून आहेत. इराणनं अमेरिकेच्या सैन्यावर हल्ला केल्यास अमेरिकेकडून जोरदार प्रतिक्रिया दिली जाऊ शकते. यामुळं संकट वाढू शकतं.

हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याची इराणची धमकी

इराणच्या संसदेनं हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. आता, इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेकडून याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यास खनिज तेलाची वाहतूक करणाऱ्या कार्गो जहाजांचा मार्ग बंद होऊ शकतो. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार 20 टक्के तेलाचा पुरवठा या मार्गातून होतो. यामुळं क्रूड ऑईल आणि गॅसच्या किमती वाढू शकतात. भारतासारख्या तेल आयातदार देशाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

कच्चा तेलाच्या दरांमध्ये वाढ

जाणकारांच्या मते क्रूड ऑईलच्या किमती प्रति बॅरल 80 डॉलरच्या वर राहणं भारतासाठी नुकसान करणारं ठरु शकतं. भारताच्या राजकोषीय धोरणांवर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. क्रूड ऑईलच्या किमती वाढल्यानं महागाई वाढू शकते.  रुपया कमजोर होऊ शकतो. कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढल्यास त्याचा मिळणारा नफा कमी होण्यावर होईल.

अमेरिकेनं इराणच्या तीन आण्विक तळांवर हल्ले केल्यानंतर क्रूड ऑईलच्या जागतिक पुरवठ्यावर परिमाण होण्याची शक्यता आहे. यामुळं क्रूड ऑईलचे दर वाढू शकतील. सोमवारी सकाळी ब्रेंट क्रूड ऑईलच्या दरात 2 टक्के वाढ झाली आहे. क्रूड ऑईल 79 डॉलर प्रति बॅरल पर्यंत पोहोचलं आहे.तर, दुसरीकडे भारतीय रुपयाची घसरण झाली आहे.

आर्थिक जाणकारांच्या मते गुंतवणूकदारांनी या अस्थिरतेच्या काळात घाबरुन न जाता विक्री करण्याऐवजी सतर्क राहण्याची गरज आहे.दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार केला पाहिजे. तेलाच्या दरात वाढ झाल्याचं तेल पुरवठादार कंपन्यांच्या स्टॉक्सर परिणाम झाला आहे. आगामी काळात इराण-इस्त्रायल संघर्ष आणि जागतिक तेल बाजारातील घडामोडींवर लक्ष ठेवावं लागेल.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेदेखील वाचा

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.