Pune News : प्रकल्पांच्या आढाव्यासाठी आयुक्तांचा स्वतंत्र कक्ष
esakal June 24, 2025 03:45 AM

पुणे - पुणे महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता वाढविणे आवश्यक आहे. कामकाजाची जुनाट पद्धत बदलून अद्ययावत होणे, क्षेत्रीय कार्यालयांची कार्यक्षमता वाढविणे आवश्यक आहे. शहरातील प्रमुख प्रकल्पांचा आढावा घेणे, कामे वेळेत मार्गी लावणे महत्त्वाचे आहे. यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करून काम करणार असल्याचे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.

प्रकल्पांना उपलब्ध होणारा निधी, कामातील गती यासह अन्य अडचणींचा आढावा घेऊन त्यावर काम करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक आठवड्याला कामाच्या प्रगतीचा अहवाल प्राप्त होणे आवश्यक असल्याने नियंत्रण कक्ष स्थापन केला जाईल. त्यावर माझे थेट लक्ष असणार आहे असे आयुक्त राम यांनी सांगितले.

झाडण काम करणारे दिसतच नाही

`सकाळ’ने गेल्या आठवड्यात शहरातील झाडणकाम करणारे कर्मचारी गायब असल्याचे वृत्त दिले. त्यातील काही जण पुढाऱ्यांच्या घरी घरगडी झाल्याचेही समोर आणल्याने खळबळ उडाली होती. आता त्यावर आयुक्त नवल किशोर राम यांनीही त्यांची भूमिका मांडली. ते म्हणाले, पुण्यात रस्ते झाडताना एकही कर्मचारी दिसत नाही, १२ हजार कर्मचारी असूनही शहर घाण दिसत आहे, रस्त्यावर कचरा पडलेला असतो.

स्वच्छ संस्था घरोघरी जाऊन कचरा संकलित करत आहे, पण स्वच्छचे कामही स्वच्छ नाही. पुणे शहरात कामावर देखरेख करणारी यंत्रणा नाही. त्यामुळे रोज किती कर्मचारी झाडणकाम याचा आकडा येणार उपलब्ध होत नाही. पुण्यापेक्षा छोट्या शहरांमध्ये अतिशय चांगल्या व पारदर्शक पद्धतीने कामे होत आहेत. पुण्यात सुधारणेची गरज आहे. ही कार्यपद्धती पुढील दोन महिन्यात सुधारली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.

महत्त्वाचे मुद्दे

- इ ऑफिसचा वापर करणे आवश्यक, अजून एकही विभाग १०० टक्के वापर करत नाही

- क्षेत्रीय कार्यालयांकडे अधिकारी असूनही कामे केले जातील नाहीत

- क्षेत्रीय कार्यालयांची कार्यक्षमता वाढवणे आवश्यक

- शहरातील अनधिकृत होर्डिंग विरोधात कारवाई होणार

- शहरी गरीब योजनेसह अन्य योजनांचे काम पूर्णपणे ऑनलाइन होणे आवश्यक

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.