इंग्लंड विरुद्ध भारत संघात हेडिंग्लेमध्ये कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू असून रिषभ पंतने हा सामना त्याच्या अतरंगी फलंदाजीने गाजवला आहे. त्याने या सामन्यात अनेक विक्रम करताना नवे विक्रम रचलेही आहेत.
आजपर्यंत कोणत्याच भारतीय यष्टीरक्षकाला न जमलेला कारनामाही त्याने करून दाखवला आहे. या सामन्यात भारताच्या दुसऱ्या डावात केएल राहुलच्या पाठोपाठ रिषभ पंतनेही शतक ठोकले आहे. त्याचे हे या सामन्यातील दुसरे शतक आहे.
या सामन्यात भारताने दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन यांच्या विकेट्स तिसऱ्या दिवशीच गमावल्या होत्या. पण चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच कर्णधार शुभमन गिलही ८ धावांवर बाद झाला. पण त्यानंतर सलामीवीर केएल राहुलला साथ मिळाली ती रिषभ पंतची.
KL Rahul Century: संकटमोचक राहुल! शतकासह बनला इंग्लंडमधील भारताचा 'नंबर वन' ओपनर; द्रविड-गावसकरांना टाकले मागेरिषभने एका बाजूने आक्रमक फटके खेळणे सुरू ठेवले होते, तर दुसऱ्या बाजूने केएल राहुल संयमी खेळ करत होता. त्यातही दुसऱ्या सत्रात दोघांनीही धावांची गती वाढवली. यादरम्यान दोघांमध्ये दीडशतकी भागीदारीही झाली. केएल राहुलने २०२ चेंडूत आधी त्याचे ९ वे कसोटी शतक पूर्ण केले.
त्यापाठोपाठ काही वेळातच रिषभ पंतने देखील १३० चेंडूत त्याचे ८ वे कसोटी शतक, तर इंग्लंडमधील चौथे शतक पूर्ण केले. तो ८ शतके करणारा भारताचा पहिलाच यष्टीरक्षक फलंदाज आहे. त्याच्यापाठोपाठ ६ शतकांसह एमएस धोनी आहे.
याशिवाय रिषभने पहिल्या डावातही १३४ धावांची खेळी केली होती. रिषभने पहिल्या डावातील शतकानंतर कोलांटीउडी मारली होती. पण दुसऱ्या शतकानंतर त्याने डोळ्यावर हात ठेवत सेलीब्रेशन केले.
रिषभ पंत एकाच कसोटी सामन्यात दोन्ही डावात शतक करणारा भारताचा पहिला, तर जगातील दुसराच यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. याआधी असा कारनामा केवळ झिम्बाब्वेच्या अँडी फ्लॉवर यांनी केला होता. त्यांनी २००१ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हरारेमध्ये १४२ आणि नाबाद १९९ धावांची खेळी केली होती.
इतकेच नाही, तर इंग्लंडमध्ये कसोटीत दोन्ही डावात शतक करणारा रिषभ भारताचा पहिलाच फलंदाजही आहे. आजपर्यंत कोणालाही असा पराक्रम करता आला नव्हता.
दरम्यान, कसोटीमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या यष्टीरक्षकांच्या यादीत आता तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने इंग्लंडच्या लेग एम्स यांची बरोबरी केली आहे. त्यांनी १९२९ ते १९३९ दरम्यान इंग्लंडसाठी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून ८ शतके केली होती.
या यादीत पहिल्या क्रमांकावर १७ शतकांसह ऑस्ट्रेलियाचा ऍडम गिलख्रिस्ट आहे. दुसऱ्या क्रमांकावर १२ शतकांसह अँडी फ्लॉवर आहेत. तसेच पंत आणि लेग एम्स पाठोपाठ चौथ्या क्रमांकावर संयुक्तरित्या एबी डिविलियर्स, एमजे प्रायर, कुमार संगकारा आणि बीजे वॉटलिंग आहेत, ज्यांच्या नावावर प्रत्येकी ७ शतके आहेत.
ENG vs IND, 1st Test: अंपायर ऐकतच नाही! गिल-बुमराहने प्रयत्न केले, रिषभ पंतने तर रागात बॉलच फेकला; जाणून घ्या नेमकं काय झालं धोनीलाही पछाडलंरिषभ पंतने आणखी एक मोठा विक्रम केला आहे. तो आता इंग्लंडमध्ये कसोटीत सर्वाधिक धावा करणारा परदेशी यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. त्याने धोनीच्या ७७८ धावांच्या विक्रमाला मागे टाकले आहे. रिषभच्या इंग्लंडमध्ये ८०० धावा पूर्ण झाल्या आहेत. तो ८०० कसोटी धावा इंग्लंडमध्ये करणारा पहिलाच परदेशी यष्टीरक्षक फलंदाज आहे.
बाशीरने केलं बादशतकानंतरही रिषभ आक्रमक खेळत होता. पण अखेर त्याला ११८ धावांवर शोएब बाशीरने ७२ व्या षटकात बाद केले. रिषभने १५ चौकार आणि ३ षटकारांसह १४० चेंडूत ही शतकी खेळी केली. त्याने केएल राहुल सोबत १९५ धावांची भागीदारीही केली.